

कोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ३० उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी २९ उमेदवार मला पराभूत करण्यासाठी प्रयत्न करत होते, तर मी केवळ विजयी होण्यासाठी लढत होतो. इतिहास घडला नसून, पुढील सहा वर्षांत इतिहास घडवून दाखवीन, असा ठाम निर्धार पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी व्यक्त केला. त्यांच्या विजयाच्या निमित्ताने आयोजित विजयी मेळावा हजारो शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
मेळाव्याची सुरुवात महाराणी ताराराणी आणि लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. त्यानंतर कावळा नाका, दसरा चौक ते श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या समाधीस्थळापर्यंत भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. घोषणांच्या गजरात शिक्षक आणि कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला.
या वेळी आमदार अशोकराव माने (बापू), श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, कोजिमाशिचे तज्ज्ञ संचालक दादासाहेब लाड, टीडीएफचे काटकर सर, विद्यासमितीचे अध्यक्ष डॉ. श्रीराम साळुंखे, प्रभारी प्राचार्य डॉ. महेश गायकवाड, प्राचार्या डॉ. शैलजा साळुंखे, प्राचार्या डॉ. श्रुती जोशी, कृती समितीचे बाबा पाटील व दत्ता पाटील, प्रसिद्ध वक्ते प्रा. मधुकर पाटील, प्रा. गीतांजली साळुंखे आणि आमदार गावडे यांच्या पत्नी मयुरी गावडे यांनी मनोगते व्यक्त केली.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आमदार गावडे यांचा सत्कार करून अभिनंदन केले. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे हक्क आणि शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर विधान परिषदेत प्रभावीपणे आवाज उठवावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
या मेळाव्यास मुरलीधर गावडे, आजीव सेवक अजित देसाई, प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, अनिल कामत, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी आणि पाच जिल्ह्यांतून आलेले शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षकांच्या विश्वासाला कृतीतून उत्तर देण्याचा निर्धार व्यक्त करत आमदार कौस्तुभ गावडे यांच्या पुढील कार्यकाळाकडे आता शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
४० तास झोपलो नाही
मेळाव्यात मनोगत व्यक्त करताना आमदार गावडे म्हणाले, एका आजी आणि एका माजी आमदाराला पराभूत करून मी विजयी झालो आहे. हा विजय शिक्षकांनी दाखवलेल्या विश्वासाचा आहे. शिक्षकांच्या प्रश्नांना निश्चितपणे न्याय मिळवून देईन. मतमोजणीच्या प्रदीर्घ प्रक्रियेचा उल्लेख करत ते म्हणाले, मतमोजणीदरम्यान मी ४० तास झोपलो नव्हतो; मात्र आता पुढील सहा वर्षे न झोपता काम करून दाखवीन. शिक्षकांच्या प्रश्नांवर ठोस काम करून इतिहास घडविण्याचा माझा निर्धार आहे.