केसरकर यांचा पुढचा प्लॅन, शिंदे समर्थकांची कोर्टात धाव

आम्ही पक्षप्रमुखांना अनेक वेळा सुचवलं होतं की, ज्या युतीत आपण लढलो, त्यांच्याच सोबत राहूया.
केसरकर यांचा पुढचा प्लॅन, शिंदे समर्थकांची कोर्टात धाव

एकनाथ शिंदे समर्थक आमदारांची बैठक शनिवारी झाली. या बैठकीनंतर आमदार दीपक केसरकर यांनी शिंदे गटाची पुढील वाटचाल कशी असेल हे जाहीर केले. गटनेता निवड, १६ आमदारांना नोटीस यासंदर्भात आम्ही कोर्टात जाऊ, असे दीपक केसरकर म्हणाले. ‘शिंदे साहेब आमचे नेते आहेत. संवाद नसला की, गैरसमज निर्माण होतात. एक गैरसमज असा की, आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो; पण आम्ही शिवसेनेचेच सदस्य आहोत’, असे केसरकर म्हणाले. दरम्यान, शिंदे गटाच्या बैठकीत दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.

आमदारांचे काही अधिकार असतात, मागण्या असतात. आम्ही पक्षप्रमुखांना अनेक वेळा सुचवलं होतं की, ज्या युतीत आपण लढलो, त्यांच्याच सोबत राहूया. कित्येक वेळा उद्धव साहेबांना आम्ही हे सांगितले, ते ऐकतील असे वाटले होते. इतके वेळा इतके जण सांगतात, याचा अर्थ त्यात तथ्य असेल, असे उद्धव ठाकरे यांना समजायला हवे होते. कोणीही आम्हाला असे करा सांगितले नाही. उद्धव ठाकरेंनीच आम्हाला एकनाथ शिंदे हे नेते असल्याचे ठरवून दिलंय, असा दावा दीपक केसरकर यांनी केला.

२/३ बहुमताचा निर्णय ही घटनात्मक तरतूद असते ती आमच्याकडे आहे. आमचे ५६ आमदार होते, आता ५५ आहेत. १६ जण एकत्र येऊन गटनेता निवडू शकत नाहीत. त्याला आम्ही कोर्टात चॅलेंज करणार आहोत, आम्हाला तो मान्य नाही, आम्ही पक्ष सोडलेला नाही, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. आमच्या गटाचे नेते एकनाथ शिंदे असतील, असे ते म्हणाले. व्हिप हा सभागृहात बजावला जातो. मीटिंगला नाही आलात तर अपात्र व्हाल, हे घाबरवण्यासाठी केले जात असल्याचे केसरकर म्हणाले.

आम्हाला विधानसभा उपाध्यक्षांनी नोटीस देताना नैसर्गिक न्यायाप्रमाणे ७ दिवसांची मुदत द्यायला हवी होती. आम्ही विधानसभा उपाध्यक्षांकडून ती वेळ वाढवून घेणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले. आम्हाला गट स्थापन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. घटनात्मक अधिकार नाही मिळाला नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ, असे ते म्हणाले.

केवळ भाजपसोबत सरकार हवे

आमच्याकडे बहुमत आहे, आमचाच पक्ष शिवसेना आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेवर दावा केला आहे. तर आम्ही संजय राऊत यांना गंभीरपणे घेत नाही असे म्हणत केसरकर यांनी राऊतांवर तोफ डागली. आम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राजीनामा नकोय, तर केवळ भाजपसोबत सरकार हवे आहे, अशी मागणी शिंदे गटाने केली आहे.

काँग्रेस - राष्ट्रवादीकडे

हात पसरावे लागतात

सगळी चांगली खाती काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे, आमच्याकडे एकही चांगले खाते नाही. आमची कामे घेऊन गेल्यावर त्यांच्यापुढे हात पसरावा लागतो. हा माणूस मुख्यमंत्र्यांचा आहे, शिवसेनेचा आहे तर त्यांनी तेवढे व्हेटेज द्यायला पाहिजे होते, पण दिले गेले नाही. ही ठिणगी राज्यसभेपासून पडली, राज्यसभेत जी मतं फुटली, ती ना शिवसेनेची होती ना शिवसेनेला सपोर्ट करणाऱ्यांची होती. त्या फुटलेल्या मतांची मीमांसा व्हायला पाहिजे होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in