

पुणे : लोहगड येथील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी दोन्ही बाजूंचा प्रदीर्घ युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सिया आणि चेतन या दोघांनाही ३ जुलैपर्यंत, म्हणजेच ५ दिवस पोलीस कोठडीत वाढ करण्याचे आदेश दिले.
सुनावणीदरम्यान सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्यांनी आरोपींच्या सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात माहिती दिली की, केतन अग्रवालच्या हत्येचा कट नेमका कुठे आणि कोणाच्या मदतीने रचला गेला, याचा तपास करणे अद्याप बाकी आहे.
सियाचे गुन्ह्याच्या ठिकाणचे नाट्यरूपांतर (रिक्रिएशन) पूर्ण झाले असले तरी, चेतन चौधरीला सोबत घेऊन लोहगडावर रिक्रिएशन करणे अद्याप बाकी आहे. त्याशिवाय, बाली येथील प्री-वेडिंग शूटला जाणे टाळण्यासाठी केतनचा पासपोर्ट फाडण्यात आला होता, त्यांचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे. आरोपींनी लोहगडावर जाऊन आधी रेकी केली होती का? तसेच हत्येनंतर केतनचा मोबाईल काही वेळाने पोलिसांच्या ताब्यात आला, त्यातील लपवलेली किंवा डिलीट केलेली माहिती रिकव्हर करणे अत्यंत गरजेचे असल्याचे पोलिसांनी कोर्टात सांगितले.
दुसरीकडे, आरोपींच्या वकिलांनी पोलीस कोठडीला जोरदार विरोध दर्शवला. सिया गोयलचे वकील विपुल दुशिंग यांनी असा युक्तिवाद केला की, सर्वोच्च न्यायालयाच्या 'पंकज बन्सल' निकालाप्रमाणे ही अटक कायदेशीर निकषांवर बसत नाही. अटकेची जी कारणे आधी दिली होती, तीच आता पुन्हा दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, या प्रकरणाची सुरू असलेली 'मीडिया ट्रायल' थांबवण्याची गरज असल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान, सुनावणी सुरू असताना सियाने स्वतः न्यायालयाला सांगितले की तिचे वकील विपुल दुशिंगच आहेत.