यापुढे निवडणुकीपासून खडसे राहणार दूर; भाजपमध्ये लवकरच प्रवेश

लोकसभा निवडणुकीपूर्वी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार होतो. परंतु, काही कारणांमुळे प्रवेश रखडला.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

विशेष प्रतिनिधी/मुंबई

लोकसभा निवडणुकीपूर्वी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार होतो. परंतु, काही कारणांमुळे प्रवेश रखडला. परंतु भाजपचे केंद्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी आपला भाजप प्रवेश लवकरच होईल, असे सांगितले आहे. त्यामुळे आपण त्याबाबत निश्चिंत आहोत. विशेष म्हणजे माझ्या पक्षप्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांचा विरोध मावळला आहे, असे सांगतानाच आपण यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जाहीर केले. त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. परंतु, आपण राजकीय निवृत्ती घेतलेली नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपने एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली, तेव्हापासून एकनाथ खडसे हे भाजप प्रवेशासाठी प्रयत्नशील होते. त्याचवेळी त्यांनी भाजप पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन चर्चाही केली होती. त्यामुळे त्यावेळीच ते भाजपमध्ये दाखल झाले असते. परंतु, पक्षांतर्गत विरोध आणि जळगाव जिल्ह्यात ऐन निवडणुकीत गटबाजी उफाळून येईल, या भीतीपोटी त्यांचा प्रवेश पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश न करता आपल्या स्नुषा रक्षा खडसे यांचा प्रचार केला. यावरून शाब्दिक चकमकीही झाल्या. परंतु, आपण भाजपच्या प्रचारात सहभागी न होता स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबविली, असे खडसे म्हणाले.

खान्देशात सध्या पूर्वीसारखे वातावरण राहिलेले नाही. केंद्र सरकारपेक्षा राज्य सरकारवर या भागात अधिक नाराजी आहे. विशेषत: शेतकरी नाखूश आहेत. मात्र, केंद्रात मोदीच पंतप्रधान व्हावेत, अशी बहुतांश लोकांची इच्छा आहे. त्याचा फायदा भाजपला नक्की होईल, असा विश्वासही खडसे यांनी व्यक्त केला. भाजप प्रवेशाबाबत बोलताना माझ्या पक्षप्रवेशाबद्दल काही लोकांची नाराजी होती. सोबत काम करताना काही लोक दुखावले जातात. त्यामुळे तसे काही नेते दुखावले होते. त्यामुळे त्यांच्या नाराजीचा परिणाम होतोच. परंतु, त्यांची नाराजी दूर करण्याचा आपला प्रयत्न आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील या नेत्यांची नाराजी दूर झाली आहे, असेही खडसे यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी यापुढे आपली निवडणूक लढण्याची इच्छा नाही. त्यामुळे आपण निवडणूक लढवणार नाही. सध्या माझ्याकडे विधान परिषदेची आमदारकी आहे. पुढील ५ वर्षे ही आमदारकी राहणार आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्याचा प्रश्न येत नाही, परंतु राजकारणात पुढे काहीही होऊ शकते. मी राजकीय माणूस आहे, असे खडसे म्हणाले.

तावडेंमुळे मी निश्चिंत

भाजपचे केंद्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी आधीच भूमिका स्पष्ट केली असून, एकनाथ खडसे यांचा लवकरच प्रवेश होईल, असे म्हटले आहे. त्यामुळे आपण निश्चिंत आहोत. येत्या काळात भाजपमध्ये प्रवेश होईल. काही नेते दुखावल्याने नाराजी होती. परंतु पुढील काळात गिरीश महाजन आणि मला एकत्रित काम करावे लागेल. पक्षहितासाठी आम्ही एकत्रित मिळून काम करू, असा विश्वासही खडसे यांनी व्यक्त केला.

रोहिणी यांचा भाजपमध्ये येण्यास नकार

भाजपमध्ये जाण्याविषयी मी माझी कन्या रोहिणी खडसे यांनाही विचारले होते. परंतु, त्यांनी भाजपमध्ये येण्यास नकार दिला. त्यांनी शरद पवार यांच्यासोबत काम करणार असल्याचे सांगितले. त्यांना विधानसभा निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे त्या राष्ट्रवादीचे काम करतील. परंतु, आपण भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर भाजपचेच काम करू, असे खडसे यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in