Jalgaon : खान्देशातील बोलीभाषांच्या जतनासाठी विद्यापीठात केंद्र; शासनाकडून निधी उपलब्ध करून देणार, उदय सामंत यांची घोषणा

खान्देशातील समृद्ध बोलीभाषांचे जतन व संवर्धन करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात येत्या सहा महिन्यांत बोलीभाषा केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
खान्देशातील बोलीभाषांच्या जतनासाठी विद्यापीठात केंद्र; सहा महिन्यांत केंद्राची स्थापना, शासनाकडून निधी उपलब्ध करून देणार
खान्देशातील बोलीभाषांच्या जतनासाठी विद्यापीठात केंद्र; सहा महिन्यांत केंद्राची स्थापना, शासनाकडून निधी उपलब्ध करून देणार(Photo-X)
Published on: 

जळगाव : खान्देशातील समृद्ध बोलीभाषांचे जतन व संवर्धन करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात येत्या सहा महिन्यांत बोलीभाषा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रासाठी मराठी भाषा विभागाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी केली.

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह-२०२६’च्या सांगता सोहळ्यात ते बोलत होते. बुधवारी (१४ ऑक्टोबर) विद्यापीठातील ए. पी. जे. अब्दुल कलाम भवनाच्या सभागृहात हा सोहळा उत्साहात पार पडला.

मंत्री डॉ. सामंत म्हणाले की, खानदेशातील समृद्ध बोलीभाषांचे जतन करण्यासाठी यंदापासून खान्देशी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व बोलीभाषांचा शब्दसंग्रह तयार करण्याचे काम मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून हाती घेण्यात येईल.

मराठी भाषेतील संशोधनाला प्रोत्साहन देण्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र साहित्य संमेलने आयोजित करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे तिची प्राचीनता, समृद्ध साहित्यिक परंपरा आणि भारतीय ज्ञानपरंपरेतील योगदान अधोरेखित झाले आहे. या पार्श्वभूमीवर बोलीभाषा

केंद्राच्या माध्यमातून खानदेशातील भाषिक वारसा जतन करण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. प्रवीण महाले आणि भाषा व विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा. म. सु. पगारे उपस्थित होते.

मातृभाषेचा अभिमान बाळगा

मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून आपल्या संस्कारांची, अस्मितेची, संस्कृतीची आणि भावविश्वाची भाषा आहे. जगातील ज्ञान आत्मसात करण्यासाठी विविध भाषा शिका; मात्र मातृभाषेचा अभिमान बाळगून तिचे संवर्धन करा. विद्यापीठात कवयित्री बहिणाबाई चौधरी बोलीभाषा केंद्र आणि संशोधन केंद्र स्थापन करून बहिणाबाईंचे तत्त्वज्ञान जगासमोर मांडण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. या उपक्रमांसाठी शासनाने सहकार्य करावे, अशी अपेक्षा कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी व्यक्त केली.

सांस्कृतिक कार्यक्रमाने सांगता

सांगता सोहळ्यानंतर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात गायक डॉ. अभिजित कोसंबी, सायली आणि प्रसन्नजीत कोसंबी यांच्या गायनाने, तसेच अभिनेते दिगंबर नाईक यांच्या अभिनयाने रंगत आणली. नृत्यदिग्दर्शक सुभाष नकाशे आणि त्यांच्या ६० कलाकारांच्या समूहाने सादर केलेल्या नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्यामकांत देवरे यांनी केले. सूत्रसंचालन खेमराज पाटील यांनी केले, तर आभार प्रा. म. सु. पगारे यांनी मानले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in