वादळी पावसाचा तडाखा; खान्देशात वीज पडून सात जणांचा मृत्यू

वादळी पावसाचा तडाखा; खान्देशात वीज पडून सात जणांचा मृत्यू

खान्देशात गेले दोन दिवस विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाचे तांडव सुरूच आहे. या वादळी पावसात जळगाव जिल्ह्यात पाचोरा व मुक्ताईनगर, चाळीसगाव येथे वीज पडून पाच जणांचा, तर धुळे जिल्ह्यात शिरपूर येथे एका शेतकऱ्याचा आणि नंदुरबार जिल्ह्यात अक्क्लकुवा तालुक्यात मोलगी येथे घरावर वीज पडल्याने एका बालिकेचा मृत्यू झाला आहे.
Published on

जळगाव : खान्देशात गेले दोन दिवस विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाचे तांडव सुरूच आहे. या वादळी पावसात जळगाव जिल्ह्यात पाचोरा व मुक्ताईनगर, चाळीसगाव येथे वीज पडून पाच जणांचा, तर धुळे जिल्ह्यात शिरपूर येथे एका शेतकऱ्याचा आणि नंदुरबार जिल्ह्यात अक्क्लकुवा तालुक्यात मोलगी येथे घरावर वीज पडल्याने एका बालिकेचा मृत्यू झाला आहे.

रविवारी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील कोंगानगर येथे शेतात काम करताना वीज पडून तीन जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला. यात लखन दिलीप पवार (१४), दशरथ उदल पवार (२४) आणि समाधान प्रकाश राठोड यांचा मृत्यू झाला असून, दिलीप उदल पवार (३५) हे जखमी झाले आहेत. पाचोरा तालुक्यात खेडगाव नंदीचे शिवारात मोहित जगतसिंग पाटील (२५) हा युवक शेतात काम करताना त्याच्या अंगावर वीज कोसळून मृत्यू पावला. मुक्ताईनगर तालुक्यात पूरनाड येथे शांतीलाल शंकर कठोरे (५५) हे शेतात काम करीत असताना सायंकाळी त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे शेतात मशागत करीत असताना अंगावर वीज कोसळून नथ्थू हरचंद सनेर (६३) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. नंदुरबार जिल्ह्यात अक्क्लकुवा तालुक्यात मोलगी येथे दिलीप वसावे यांच्या घरावर वीज पडल्याने त्यांची १० वर्षाची मुलगी माया दिलीप वसावे हिचा मृत्यू झाला.

logo
marathi.freepressjournal.in