खान्देशचा पाणीप्रश्न मिटला! समाधानकारक पावसामुळे धरणात ६३ टीएमसी पाणीसाठा; पिण्याच्या पाण्याची, रब्बी हंगामाची चिंता मिटली

यंदा या तीन ही जिल्ह्यात समाधानकाक पाऊस झाल्याने नद्या-नाल्यांना पूर आले आणि धरणे भरल्याचे चित्र पहावयास मिळाले.
खान्देशचा पाणीप्रश्न मिटला! समाधानकारक पावसामुळे धरणात ६३ टीएमसी पाणीसाठा; पिण्याच्या पाण्याची, रब्बी हंगामाची चिंता मिटली
Published on

जळगाव: गेल्यावर्षी जाणवलेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर यंदा जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असून जळगाव जिल्ह्यातील गिरणा, वाघूर, हतनूर ही मोठी धरणे भरली आहेत तर धुळे जिल्ह्यातील आठ धरणे आणि नंदुरबार जिल्ह्यातील पाच धरणे पूर्ण क्षमतेने भरली असल्याने पुढील उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नाही. तसेच रब्बी हंगामाची चिंता मिटली असून रब्बी पिकांना देखील पाणी देता येईल, असे लाभक्षेत्र विकास प्राधीकरणचे अधीक्षक अभियंता रीकांत दळवी यांनी गुरुवारी सांगितले.

गेल्यावर्षी अपुऱ्या पावसाने जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील अनेक धरणात पाणीसाठा नव्हता, उन्हाळ्यात अनेक धरणे ही कोरडी पडली होती. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे असलेल्या गिरणा धरणात केवळ अकरा टक्के पाणीसाठा शिल्लक होता, त्यामुळे सर्वजण पावसाची वाट पाहत होते.

आजच्या तारखेला गेल्यावर्षी जळगाव जिल्ह्यातील विविध धरणात केवळ २८ टक्के, धुळे जिल्ह्यात १० टक्के तर नंदुरबार जिल्ह्यात केवळ ५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यंदा या तीन ही जिल्ह्यात समाधानकाक पाऊस झाल्याने नद्या-नाल्यांना पूर आले आणि धरणे भरल्याचे चित्र पहावयास मिळाले.

जळगाव जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. पाणीटंचाईचा प्रश्न देखील मिटल्याने उत्तर महाराष्ट्रात पाण्याची पातळी वाढली आहेत. जळगाव जिल्ह्यातील गिरणा , वाघूर, हतनूर ही मोठी धरणे भरली आहेत तर धुळे जिल्ह्यातील आठ धरणे आणि नंदुरबार जिल्ह्यातील पाच धरणे पूर्ण क्षमतेने भरली असल्याने पुढील उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नाही.

धुळे जिल्ह्यातील चौदापैकी नऊ प्रकल्प हे आज पूर्ण क्षमतेने भरले गेले आहेत. धुळे जिल्ह्यात विविध धरणात मिळून आज ७४ टक्के पाणीसाठा झालेला आहे. गेल्यावर्षी याच दिवशी ५३ टक्के पाणीसाठा होता. नंदुरबार जिल्ह्यातील सातपैकी पाच धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून या तीन ही जिल्ह्यातील विविध धरणात ६३ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. पिण्यासाठी तसेच शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊ शकेल.

- श्रीकांत दळवी, अभियंता अधीक्षक, नवी मुंबई

जळगाव जिल्ह्यात ४२.२७ टीएमसी पाणीसाठा

सात तालुके, १० नगरपालिका, १३० पाणीपुरवठा योजना, १७४ गावांना पाणीपुरवठा करणारे जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरण आज ९६ टक्के भरले आहे. जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे वाघूर धरण १०० टक्के भरले आहे. सहा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असल्यामुळे मोठे प्रकल्प, मध्यम प्रकल्प आणि लघु प्रकल्प मिळून ४२.२७ टीएमसी इतका पाणीसाठा झालेला आहे.

logo
marathi.freepressjournal.in