मराठी साहित्य संमेलनात खान्देशी संस्कृती ; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला‌ साहित्य संमेलन तयारीचा आढावा

रस्त्यांची कामांची पाहाणी करत साहित्य संमेलनाच्या आयोजनात कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या प्रशासनाला व आयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांना‌ त्यांनी प्रसंगी सूचना दिल्या.
मराठी साहित्य संमेलनात खान्देशी संस्कृती ; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला‌ साहित्य संमेलन तयारीचा आढावा

जळगाव : अमळनेर येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अंतिम टप्प्यातील तयारीचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज आढावा घेतला. रस्त्यांची कामांची पाहाणी करत साहित्य संमेलनाच्या आयोजनात कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या प्रशासनाला व आयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांना‌ त्यांनी प्रसंगी सूचना दिल्या.

अमळनेर येथे २ ते ४ फेब्रुवारी कालावधीत ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या साहित्य संमेलन तयारी अंतिम टप्प्यात आली असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात बैठक घेत तयारीचा आढावा घेतला. याप्रसंगी खान्देश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, उपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, संचालक निरज अग्रवाल, मराठी वाड्•मय मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.अविनाश‌ जोशी, अमळनेर उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, पोलीस उपअधीक्षक सुनिल नंदवाळकर, तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी राज्यसभा सदस्य व्ही. मूरलीधरन‌ यांच्या खासदार निधीतून साहित्य संमेलन स्थळावर सुरू असलेल्या स्वच्छतागृह बांधकाम प्रगतीचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. सध्या हे ९० टक्के कामकाज पूर्ण झाले असल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे यांच्या निधीतून साहित्य संमेलन स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरण, कॉंक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानात संमेलनस्थळाकडे जाणाऱ्या चारही दिशेने जाणाऱ्या व येणाऱ्या रस्त्यांच्या कामांचे मजबुतीकरण, डांबरीकरण, कॉंक्रीटीकरण पूर्ण झाली असल्याची माहिती बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

महावितरणच्या माध्यमातून करण्यात कामांचाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी आढावा घेतला. स्वच्छता, पाणीपुरवठा, पोलीस बंदोबस्त, वाहतूक आराखडा, व्हीआयपी पाहुण्यांसाठी साहित्य संमेलन स्थळी पोहचण्याचा पर्यायी मार्ग, पार्किंग व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था, हेलिपॅड व्यवस्थेचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. प्रत्येकाला नेमून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. अमळनेर येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खान्देशातील लोककला आणि लोकसंगीत यांचेही सादरीकरण होणार आहे.

विशेष म्हणजे या लोककलांचे सादरीकरण त्या-त्या लोककलांचे तज्ञ व पारंपारिक पद्धतीने सादरीकरण करणारी मंडळे सादर करणार आहेत.

खान्देशी संस्कृतीचे दर्शन

याच दिवशी सभामंडप क्र. २ कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात दुपारी १२.३० ते १.३० वा खान्देशी बोलीभाषांवर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यात अहिराणी, तावडी, भिल्ली, लेवा गणबोली, गुर्जर या बोलीभाषांचा समावेश करण्यात आला आहे. डॉ. रमेश सूर्यवंशी (अहिराणी), अशोक कोळी (तावडी), डॉ. पुष्पा गावीत (भिल्ली), डॉ. जतीनकुमार मेढे (लेवा गणबोली), डॉ. सविता पटेल (गुर्जर) हे सहभागी होतील. रात्री रात्री ८ ते १० वा. सभामंडप क्र १ खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी सभागृहात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या रचनांवर आधारित "अरे संसार संसार" हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. यात 'परिवर्तन' गृपतर्फे ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, हर्षल पाटील व सहकलाकार सहभागी होतील.

logo
marathi.freepressjournal.in