खरात-केसरकर 'कनेक्शन' प्रकरण तापले; ठाकरे सेनेचे आक्रमक आंदोलन; केसरकरांच्या राजीनाम्याची मागणी

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून ठाकरे सेना आक्रमक झाली असून, आज शहरात जोरदार आंदोलन करण्यात आले. या प्रकरणात आमदार दीपक केसरकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत ‘एसआयटी’मार्फत सखोल चौकशीची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
खरात-केसरकर 'कनेक्शन' प्रकरण तापले; ठाकरे सेनेचे आक्रमक आंदोलन; केसरकरांच्या राजीनाम्याची मागणी
Published on

सावंतवाडी : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून ठाकरे सेना आक्रमक झाली असून, आज शहरात जोरदार आंदोलन करण्यात आले. या प्रकरणात आमदार दीपक केसरकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत ‘एसआयटी’मार्फत सखोल चौकशीची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी मोर्चा काढत प्रांत कार्यालयावर धडक दिली. यावेळी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याची विनंती शिष्टमंडळाने केली. आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

भोंदूबाबा अशोक खरात आणि आमदार केसरकर यांच्यातील नेमके संबंध काय आहेत, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी ठाकरे सेनेने केली आहे. उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी करत, या प्रकरणामुळे सावंतवाडीची प्रतिमा मलिन झाली आहे, अशी टीका केली.

महिला काँग्रेसचीही राजीनाम्याची मागणी

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा साक्षी वंजारी यांनीही केसरकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. खरात यांच्यासोबतचे फोटो समोर आल्याने सावंतवाडी शहराची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप त्यांनी केला. रूपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतरही केसरकरांचे नाव समोर येत असल्याने त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी, तसेच ‘एसआयटी’मार्फत चौकशी पूर्ण होईपर्यंत पद सोडावे, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा काँग्रेसकडून जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

माझ्यावर होत असलेले आरोप पूर्णपणे राजकीय व चुकीचे आहेत. अशोक खरात यांचे कृत्य निंदनीय असून त्यांची सखोल चौकशी होऊन कठोर कारवाई व्हावी. व्हायरल होणारा फोटो हा त्यांच्या मुलीच्या लग्नातील असून, माझे शिर्डीला जाताना सिन्नरमार्गे येणे-जाणे होत असते. तसेच, संजय राऊत यांनी केलेले आरोप 'धादांत खोटे' आहे.

दीपक केसरकर, आमदार शिंदे सेना

logo
marathi.freepressjournal.in