खारेगाव टोलनाका पुन्हा सुरू होणार; नऊ वर्षांनंतर वाहनचालकांवर पुन्हा टोलचा भार

मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनंतर पुन्हा सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. २०१७ साली बंद करण्यात आलेला हा टोलनाका आता नव्या रस्ते प्रकल्पामुळे पुन्हा उभारला जात आहे. समृद्धी महामार्गाशी जोडणाऱ्या आमने ते ठाणे या दहा पदरी मार्गिकेच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
खारेगाव टोलनाका पुन्हा सुरू होणार; नऊ वर्षांनंतर वाहनचालकांवर पुन्हा टोलचा भार
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनंतर पुन्हा सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. २०१७ साली बंद करण्यात आलेला हा टोलनाका आता नव्या रस्ते प्रकल्पामुळे पुन्हा उभारला जात आहे. समृद्धी महामार्गाशी जोडणाऱ्या आमने ते ठाणे या दहा पदरी मार्गिकेच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मुंबईकडे जाणारा प्रवास वेगवान होणार असला तरी ठाणे, कल्याण, भिवंडी, नवी मुंबई आणि मुंबईकडे येणाऱ्या वाहनचालकांना पुन्हा टोलचा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.

मुंबई नाशिक महामार्गावरील माजिवडा ते वडपे या २३ किमी लांबीच्या प्रकल्पाचं काम ९० टक्के पूर्ण झालं आहे. येत्या काही महिन्यात या मार्गिकच्या निर्माणाचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई-नाशिक महामार्ग आणि समृद्धी महामार्गावरून मुंबईच्या दिशेने होणारा प्रवास वेगवान होणार आहे. मात्र असं असलं तरी वाहनचालकांना टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

मुंबई नाशिक महामार्गावर खारेगाव इथे असलेला टोलनाका 2017 साली बंद करण्यात आला. मात्र आता समृद्धी महामार्गावर जोडण्यासाठी आमने ते ठाणे असा दहा पदरी रस्ता तयार करण्यात आल्याने पुन्हा एकदा खारेगाव इथे टोलनाक्याची उभारणी सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान या निर्णयाला मनसेने विरोध केला आहे. काहीही झाले तरी टोलनाका उभारू देणार नाही असा पवित्रा मनसेने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने घेतला आहे. टोलच्या नावाखाली सरकार सामन्यांची लूट करत आहे अशी टीका मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली. तर हा नाका बंद पाडण्याचा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिला आहे.

पुन्हा टोल का?

१९९८ या वर्षी खारीगाव टोलनाका सुरु झाला होता. टोलवसूली विरोधात अनेकदा आंदोलन देखील झाले होते. २०१७ मध्ये हा टोलनाका कायमस्वरुपी बंद करण्यात आला होता. त्यामुळे ठाणे ते भिवंडी, कल्याण आणि कल्याण, भिवंडी, नाशिक, उरण जेएनपीए येथील हजारोहलकी, जड-अवजड वाहन चालकांना टोलपासून मुक्तता मिळाली होती. भविष्यात ठाणे कोस्टल रोडही या मार्गिकेशी जोडला जाणार असल्याने वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्य रस्ते विकास महामंडळ 15 वर्षे देखभाल करणार असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण टोल वसुली करणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in