
दीपक गायकवाड / मोखाडा
ग्रामीण विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर. आर. (आबा) पाटील गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान योजनेंतर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात पालघर जिल्ह्यातील आठ गावे ‘सुंदर गाव’ योजनेतून निवडण्यात आली आहेत. यात खोडाळा ग्रामपंचायत अव्वल ठरली असून, या ग्रामपंचायतीला दहा लाख रुपयांचा प्रोत्साहन निधी आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
खोडाळा ग्रामपंचायतच्या सरपंच कविता पाटील आणि ग्रामपंचायत अधिकारी देविदास दोंदे यांना हा पुरस्कार पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पालघर येथील सन्मान सोहळ्यात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारांचे वितरण दिनांक ४ ऑक्टोबर रोजी पालघर येथे पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले असून, पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कारांमुळे इतरही ग्रामपंचायती सुंदर ग्राम योजनेसाठी उद्युक्त होतील, अशी आशा पालकमंत्री नाईक यांनी व्यक्त केली आहे. तसेच या पुरस्कारांमुळे नागरिकांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे.
आठ ग्रामपंचायतींची निवड
यापूर्वी सुरू असलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचे रूपांतर करून मुख्यमंत्री स्मार्ट ग्राम योजना अंमलात आली आहे. मात्र, सन २०२३-२४ चे पुरस्कार वितरित करण्याचे राहिले होते. या पुरस्कारांसाठी पालघर जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती. यात खोडाळा ग्रामपंचायत सर्व निकष पार केल्यामुळे समाविष्ट करण्यात आली होती.
या ग्रामपंचायतींमुळे इतरही ग्रामपंचायतींवर सकारात्मक प्रभाव पडून त्याही स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास आणि लोकसहभाग या उपक्रमांना गती देऊ शकतील, हाच या पुरस्कार वितरणामागचा प्रमुख उद्देश आहे. खोडाळासारख्या ग्रामपंचायती इतरांसाठी प्रेरणास्रोत ठरतील. - गणेश नाईक, पालकमंत्री