शहापूर : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेच्या निर्मितीनंतर खालापूर टोलनाका परिसरातील पाच किमी परिसराचा विकास करत रस्ते विकास महामंडळ व औद्योगिक विभागाने खालापूर एमआयडीसी उभारण्यात आली. यामुळे खालापूर तालुक्यातील युवकांना स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध झाला. त्याच धर्तीवर आता मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील पहिल्या इंटरचेंज ठरणाऱ्या शहापूर तालुक्यातील खुटघर टोलनाका परिसरातील पाच किमी गावांचा विकास करण्याची महत्त्वपूर्ण योजना महाराष्ट्र शासनाने आखली आहे.
आदिवासी बहुल असलेल्या या तालुक्यात हजारो एकर पडिक व शेतीजमिनी उपलब्ध असून त्यांचा विकास केल्याने स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी मिळणार आहे. तालुक्यातील खर्डी येथे मंजूर झालेल्या एमआयडीसीमध्येही आंतरराष्ट्रीय कंपन्या येण्याची शक्यता असून, त्याचा फायदा स्थानिकांना होणार आहे.
‘गोडाऊन हब’ म्हणून नावारूपाला येणार
या परिसरात खासगी कंपन्यांनी जमिनी खरेदीस सुरुवात केली असून, लवकरच हा भाग ‘गोडाऊन हब’ म्हणून ओळखला जाणार आहे. खूटघर इंटरचेंज व आसपासच्या शेलवली, काजगाव, धसई, शिलोत्तर, साठगाव, नडगाव, दोनघर आदी गावांचा विकास होणार असून येथे औद्योगिक वसाहती, आंतरराष्ट्रीय कंपन्यांची गोडाऊन, हॉटेल्स, बांधकाम प्रकल्प उभारले जाणार आहेत.
दरम्यान, एमएसआरडीसीने समृद्धी महामार्गापासून १०० मीटर अंतरातील जमिनीवर कोणतेही बांधकाम करण्यासाठी एनओसी घेण्याची अट घातली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मुंबईला धाव घ्यावी लागत असल्याने ती अट रद्द करावी. - लक्ष्मण दुधाळे, स्थानिक समृद्धी बाधित शेतकरी
तालुक्यात विकासाच्या दृष्टीने प्रकल्प येणे स्वागतार्ह आहे, मात्र शेतजमिनींचे व्यवहार हे पारदर्शक असणे अत्यावश्यक आहे. - सतीश पातकर, सामाजिक कार्यकर्ते