किडनी ७५, लिव्हर ९० तर डोळे २५ हजारांत कर्ज फेडण्यासाठी १० शेतकऱ्यांनी काढले अवयव विक्रीला

सोयाबीनचे पिक येलोमोझॅक रोगामुळे हाती आले नाही तर कापसावर लाल्या रोग पडल्याने नुकसान झाले.
किडनी ७५, लिव्हर ९० तर डोळे २५ हजारांत 
कर्ज फेडण्यासाठी १० शेतकऱ्यांनी काढले अवयव विक्रीला

हिंगोली : शेतकऱ्यांच्या आत्महत्या नव्या नाहीत. पण, आता कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत:चा जीव देऊन मोकळे होण्यापेक्षा अवयव विकून कर्ज फेडण्याची जीवघेणी शक्कल काढली आहे. हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील १० शेतकऱ्यांनी पीक कर्ज फेडण्यासाठी चक्क आपले अवयव विक्रीला काढले आहेत. या शेतकऱ्यांनी आपल्या मौल्यवान अवयवांचा दरच जाहीर केला असून किडनी ७५ हजार, लिव्हर ९० हजार तर डोळे २५ हजार रुपये प्रमाणे विक्रीला काढला आहे. या शेतकऱ्यांनी शासनाला निवेदन पाठवून अवयव खरेदी करण्याची विनंती केली आहे.

यावर्षी मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी पाऊस झाला, मात्र तो विस्कळीत स्वरुपात झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यालाही या पावसाचा फटका बसला आहे. सोयाबीनचे पिक येलोमोझॅक रोगामुळे हाती आले नाही तर कापसावर लाल्या रोग पडल्याने नुकसान झाले. सोयाबीनचा लागवडीचा खर्चदेखील निघाला नाही. तर इतर पिकेही हातची गेली आहेत. या परिस्थितीत पीक कर्ज कसे भरावे, एवढाच नाही तर उदरनिर्वाहाचा प्रश्‍नही निर्माण झाला आहे. जो काही शेतमाल हाती आला, त्याला बाजारपेठेत भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत आणखीनच भर पडली आहे.

त्यामुळे पीक कर्ज कसे फेडावे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. म्हणून पीक कर्ज फेडण्यासाठी सेनगाव तालुक्यातील गोरेगाव, माझोड, केंद्रा बुद्रुक व ताकतोडा येथील १० शेतकऱ्यांनी स्वत:चे अवयव विक्रीला काढले आहेत. या संदर्भात शेतकरी गजानन कावरखे, दीपक कावरखे, विजय कावरखे, अशोक कावरखे, रामेश्‍वर कावरखे (रा. गोरेगाव), दशरथ मुळे, संजय मुळे (रा. माझोड), गजानन जाधव, धिरज मापारी (रा. केंद्रा बुद्रुक), नामदेव पतंगे (रा. ताकतोड) यांनी शासनाला एक निवेदन पाठवून आपले अवयव सरकारने खरेदी करून पीक कर्जाची परतफेड करावी, अशी विनंती केली आहे.

या शेतकऱ्यांवर आहे कर्ज

गजानन कावरखे २ लाख, दीपक कावरखे ३ लाख, विजय कावरखे १.१० लाख, दशरथ मुळे १.२० लाख, संजय मुळे २ लाख, धीरज मापारी २.२५ लाख, रामेश्‍वर कावरखे ९० हजार, नामदेव पतंगे २.९९ लाख, अशोक कावरखे, गजानन जाधव, रामेश्‍वर कावरखे यांच्यावर प्रत्येकी १.५० ते २ लाख रुपयांचे कर्ज आहे.

logo
marathi.freepressjournal.in