घोसाळकरांची हत्या सुपारी देऊन? उद्धव ठाकरेंनी उपस्थित केली शंका राज्यात खुलेआम गुंडगिरी

राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे. घोसाळकर यांच्या हत्येचे प्रकरण जेवढे दिसतेय तेवढे सोपे नाही.
घोसाळकरांची हत्या सुपारी देऊन? उद्धव ठाकरेंनी उपस्थित केली शंका राज्यात खुलेआम गुंडगिरी

मुंबई : अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस यानेच गोळ्या चालवल्या की आणखी कुणी? त्या दोघांनाही मारण्याची सुपारी दुसऱ्या कुणी दिली होती का, अशी शंका उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेतून व्यक्त केली. त्यातच अभिषेक घोसाळकर यांचा शवविच्छेदन अहवालही समोर आला असून घोसाळकर यांच्या शरीरात चार गोळ्या घुसल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाकरे म्हणाले, राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे. घोसाळकर यांच्या हत्येचे प्रकरण जेवढे दिसतेय तेवढे सोपे नाही. सूडभावनेतून माणूस अत्यंत टोकाचं पाऊल उचलतो. त्याने हत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले असेल तर आत्महत्या का केली, हा प्रश्न राहतो. गोळ्या कोण झाडत आहे, हे कळत नाही. मॉरिसकडे परवानाधारक शस्त्र नव्हते. त्याने त्याचा बॉडीगार्ड मिश्राचे शस्त्र वापरले. त्याने बॉडीगार्ड का ठेवला? त्याच्यावर ती वेळ का आली? असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.

उद्धव ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रातील पोलिसांवर दबाव आहे. गेले दीड वर्षे राज्यात गुंडगिरी सुरू आहे. खुलेआम हत्या होत आहेत. सुपारी देऊन मॉरिस आणि घोसाळकरांची हत्या करण्यात आली का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पोलिसांवर जनतेला विश्वास राहिलेला नाही.”

राज्याचे गृहमंत्री मनोरुग्ण

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केलेल्या वक्तव्याचा समाजार घेताना ठाकरे म्हणाले, ‘‘राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे. सरकार पोलिसांच्या नाहीतर गुंडांच्या पाठीशी उभे आहे. सरकार गुंडांच्या मागे उभे राहिले तर असेच राज्यात घडेल. देवेंद्र फडणवीस यांना मी कलंक, फडतूस म्हटले आहे. हे शब्द खूप सौम्य आहेत. त्यांना निर्घृण म्हणावे लागेल. आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभला की काय? असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in