तंबाखू चारून चिमुरडीची हत्या ;तिसरीही मुलगीच झाल्याच्या नैराश्यातून बापाचे कृत्य

आजारपणाने चिमुरडीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले
तंबाखू चारून चिमुरडीची हत्या ;तिसरीही मुलगीच झाल्याच्या नैराश्यातून बापाचे कृत्य

जळगाव : आधीच दोन मुली असताना तिसरीही मुलगी झाल्याने निराश झालेल्या बापाने आठ दिवसांच्या चिमुरडीच्या तोंडात तंबाखू कोंबून तिची हत्या केल्याचा निर्दयी प्रकार जामनेर तालुक्यातील हरिनगर तांडा येथे मंगळवारी उघडकीस आला आहे. आशा कर्मचारी महिलेच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून नराधम बाप गोकुळ गोटीराम जाधव (३०) याला पोलिसांनी अटक केली आहे.

आरोग्य विभागाच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, वाकोदजवळील हरिनगर तांडा (ता. जामनेर) येथील रहिवासी गोकुळ जाधव याला दोन मुली आहेत. शनिवारी २ सप्टेंबर रोजी वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याच्या पत्नीने तिसऱ्या मुलीलाच जन्म दिला. पहिल्या दोन मुली असताना तिसरीही मुलगीच झाल्याने गोकुळ जाधवने रविवारी १० सप्टेंबरला या चिमुरड्या बाळाची हत्या केली. आशा सेविका या नवजात अर्भकांच्या जन्माची नोंद घेण्यासाठी गोकुळच्या घरी गेल्या, त्यावेळी चिमुरडी तिथे नव्हती. आशा सेविकेने ही माहिती वरिष्ठांना कळवली.

वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत मंगळवारी गावात पोहोचले. त्यांना सुरुवातीला आजारपणाने चिमुरडीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. डॉ. कुमावत यांनी गोकुळला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी त्याने चिमुरडीला मारल्याची कबुली दिली. गोकुळने रविवारी चिमुरडीच्या तोंडात तंबाखू दिली आणि तिला झोळीत झोपविले. यात तिचा मृत्यू झाला. रात्री चिमुरडीच्या मृतदेहाची फर्दापूर ते वाकोद रस्त्यावर खड्डा खोदून विल्हेवाट लावल्याची त्याने कबुली दिली. रात्री उशिरापर्यंत गोकुळ जाधवविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in