ऑस्ट्रेलियाच्या राजाचा मुंबईत पार पडला पाद्यपूजन सोहळा!

१६ जुलै रोजी हा बाप्पा जहाजाने तब्ब्ल २ महिने प्रवास करत ऑस्ट्रेलियाच्या अडेलैडे शहरात पोहचणार
ऑस्ट्रेलियाच्या राजाचा मुंबईत पार पडला पाद्यपूजन सोहळा!

पावसाळा सुरु झाला की एकापाठोपाठ एक सण उत्सवांना देखील सुरुवात होऊ लागते. यामध्ये विशेष उत्सुकता असते ती गणेशोत्सवाची... लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच गणरायाची उत्सुकतेने वाट पाहत असतात. अवघ्या अडीच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गणरायाच्या आगमनासाठी विविध गणेशोत्सव मंडळाची सुरुवात झाली असतानाच सातासमुद्रापार असणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या राजाने मात्र यंदाच्या उत्सवात आघाडी घेतली आहे. सोमवारी १३ जून रोजी चिंचपोकळी येथील बागवे आर्ट्स कार्यशाळेत ऑस्ट्रेलियाच्या राजाचा ढोलताशांच्या गजरात पाद्यपूजन सोहळा पार पडला. येत्या १६ जुलै रोजी हा बाप्पा जहाजाने तब्ब्ल २ महिने प्रवास करत ऑस्ट्रेलियाच्या अडेलैडे शहरात पोहचणार आहे.

     मागील काही वर्षांपासून गणेशोत्सवामध्ये अनेक स्थित्यंतरे होत गेली आहेत. सुरुवातीला महाराष्ट्रापुरता मर्यादित असणारा हा उत्सव अल्प काळातच भारतासहित अन्य देशांमध्येही तितक्याच आत्मीयतेने आणि उत्साहाने साजरी होऊ लागला. ऑस्ट्रेलियातील अडेलैडे शहरातील मूळ भारतीय असणाऱ्या नागरिकांनी सातासमुद्रापार गणेशोत्सव रुजवला आणि लोकप्रिय ही केला. दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या अडेलैडे शहरात २०१६ साली स्थापन झालेल्या युनाइटेड इंडियन्स ऑफ साऊथ ऑस्ट्रेलिया या संघटनेने प्रथम गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरी करण्यास सुरुवात केली. आजही ती परंपरा कायम असून यंदा हे या संघटनेचे ६वे वर्ष आहे. 'ऑस्ट्रेलियाचा राजा' म्हणून ख्याती असणाऱ्या या परदेशी बाप्पाची अखिल भारतीय सार्वजनिक गणेश उत्सव समितीमध्ये देखील नोंद असून अशाप्रकारे परदेशातील गणराय नोंद असलेला हा बहुधा एकमेव परदेशी गणपती असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, २०१६ रोजी पहिल्या वर्षाचा गणपती लालबागच्या राजाचे मूर्तिकार मनोहर बागवे आणि सदानंद बागवे यांच्याकडून करवून घेण्यात आला होता. हा पहिला बाप्पा सुमारे १२ फूट उंच होता. ऑस्ट्रेलियाच्या राजाचा हा उत्सव गेले सहा वर्षे अगदी निर्विघ्न पार पडत आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियाच्या राजाची काही वेगळीच शान आहे. राजाची मूर्ती तब्बल २१ फूट उंच असून चिंचपोकळी येथील बागवे आर्ट्स कार्यशाळेत मूर्तिकार बागवे यांनी ही मूर्ती साकारली आहे. १६ जुलै रोजी जहाजने समुद्री मार्गे हा बाप्पा परदेशी वारीला निघणार आहे. कित्येक हजार किलोमीटर प्रवास करत हा राजा दिमाखात अडेलैडे शहरात पोहचणार असून परदेशात सार्वजनिक गणेशोत्सवातील सर्वात उंच मूर्ती म्हणून यंदा या बाप्पाच्या नवे विक्रम नोंद होणार आहे. तर अडेलैडेमध्ये ३ आणि ४ सप्टेंबर या दोन दिवशी गणेशोत्सव साजरा होणार आहे. संपूर्ण ऑस्ट्रेलियामधून १५ हजार पेक्षा जास्त भाविक दर्शनाला येणार असल्याचे UIOSA चे भारतातील संपर्क प्रमुख राजेंद्र झेंडे यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री, राज्यपालांकडून पत्राद्वारे कौतुक 

ऑस्ट्रेलियाच्या या राजाचा पाद्यपूजन सोहळा पार पडल्यानंतर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रीमियर, सांस्कृतिक मंत्री आणि इतर अनेक मान्यवरांसह महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, स्मृती इराणी अशा अनेक मान्यवरांनी पत्राद्वारे या उपक्रमाचे कौतुक करत गणेशोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in