

कराड : साताऱ्यातील काही गावांनी आगळेवेगळे पण मानवी व पर्यावरणीय जीवनासाठी आवश्यक असे उपक्रम राबवले व आपला डंका केवळ राज्यातच नव्हे तर देशातही पिटला. यामध्ये पहिले पुस्तकांचे गाव भिलार, पहिले मधाचे गाव मांघर, पहिले फळांचे गाव धुमाळवाडी, पहिले झाडांचे पुनर्वसन करणारे गाव म्हसवे तर सौरऊर्जा निर्मितीचे पहिले स्वयंपूर्ण गावही साताऱ्यातील पाटण तालुक्यातील मान्यांचीवाडी, त्यानंतर आता यामध्ये आणखी एका पहिल्या गावाची भर पडली असून विशेष म्हणजे वाघ व बिबट्या गणनेच्या धर्तीवर ‘तरसांची गणना’ करणारे महाराष्ट्रातील पहिले गाव म्हणून राज्याच्या संवर्धन नकाशावर माण तालुक्यातील किरकसाल गावाने स्थान पटकावले आहे.
साताऱ्यातील पूर्वेकडील माणदेशी म्हणून गणला जात असलेल्या परिसरातील खटाव, माण हे तालुके म्हणजे कायम दुष्काळी या बिरुदावलीने संबोधिले जातात. बारा महिने पाण्याचे दुर्भिक्ष्य, केवळ जिराईत शेती व पिकांवर उदरनिर्वाह, तरीही आपल्या कौशल्यपूर्णउपक्रमांनी आपला डंका सर्वदूर पिटण्यात हे तालुके नेहमी अग्रभागी असतात. असाच स्तुत्य उपक्रम राबवण्यात आणखी एका गावाने डंका पिटला असून गेल्या दोन वर्षात जैवविविधता संवर्धनाच्या क्षेत्रात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात तब्बल सहाशे सहा वन्यजीव व वनस्पती घटकांची अधिकृत नोंद करून माण तालुक्यातील ‘किरकसाल’ गावाने नवा इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे वाघ व बिबट्या गणनेच्या धर्तीवर ‘तरसांची गणना’ करणारे महाराष्ट्रातील पहिले गाव म्हणून राज्याच्या संवर्धन नकाशावर किरकसालने स्थान मिळवले आहे.
जैवविविधता वारसा स्थळ घोषित करण्याची मागणी
या उल्लेखनीय नोंदींमुळे शासनाकडून हा परिसर जैवविविधता वारसा स्थळ किंवा संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित होणे आवश्यक आहे, अशी मागणीही किरकसाल ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, किरकसाल संवर्धन प्रकल्प प्रमुख चिन्मय सावंत, जीवशास्त्रज्ञ नयन उपाध्ये, अर्णव गंधे, आनित बनसोडे, प्रथमेश व विशाल काटकर, अभिजीत माने यांनी परिश्रम घेतले.
तब्बल ६०६ घटकांची नोंद
या जैवविविधतेमध्ये तब्बल ६०६ घटकांची नोंद करण्यात आली. दोन वर्षांच्या शास्त्रीय अभ्यासात किरकसाल परिसरात १६० विविध वनस्पती प्रजाती, गवताळ प्रदेशातील २१२ पक्षी, ९१ फुलपाखरांच्या प्रजाती, ५६ इतर कीटक, पंधरा प्रकारचे चतुर व टाचणी, कोळ्यांच्या १३ प्रजाती, ३४ सरपटणारे व उभयचर, १८ प्रकारचे सस्तन प्राणी, माशांच्या ७ प्रजाती अशा ६०६ जैवविविधता घटकांची प्रमाणित नोंद मिळाली. याशिवाय सध्या दुर्मिळ होत चाललेल्या पट्टेरी तरस, खोकड व लांडग्यांचा प्रजनन अधिवास या परिसरात असल्याचे स्पष्ट झाले.
अशी झाली तरसांची गणना
सस्तन प्राण्यांच्या नोंदीसाठी किरकसाल परिसरात बारा कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले. यात विविध प्राण्यांची छायाचित्रे टिपली गेली. यामध्ये तरसाची ५३ छायाचित्रे टिपली गेली. तरसाच्या शरीरावर पट्टे असतात. त्यानुसार तरसांची संख्या मोजली असता या परिसरात पाच प्रौढ तरस तर दोन निमवयस्क तरस आढळले. वाघांप्रमाणेच भारतीय तरसांवर पट्टेरी रचना असते. प्रत्येक तरसाच्या शरीरावर ही रचना भिन्न असते. या रचनेवरून तरसांची संख्या मोजण्यात आली. या तरसांना वेगवेगळे सांकेतिक क्रमांक देण्यात आले असून वर्षभर या तरसांची नोंद करण्यात आली.