Kirti Bharadia: पोहण्यात जागतिक कामगिरी करणाऱ्या कीर्तीच्या यशामागचे रहस्य काय?

सोलापूरच्या १६ वर्षाच्या कीर्ती भराडियाने (Kirti Bharadia) अरबी समुद्रात सलग ७ तास २२ मिनिटं पोहून तब्बल ३७ किमीचे अंतर कापत जागतिक विक्रम केला.
Kirti Bharadia: पोहण्यात जागतिक कामगिरी करणाऱ्या कीर्तीच्या यशामागचे रहस्य काय?

सोलापूरमध्ये राहणाऱ्या १६ वर्षाच्या जलतरणपटू कीर्ती नंदकिशोर भराडियाने (Kirti Bharadia) एक अनोखा जागतिक विक्रम केला. तिने अरबी समुद्रात तब्बल ७ तास २२ मिनिटं पोहत ३७ किमी अंतर पार केले. गुरुवारी दुपारी १२ वाजता मुंबईतील वरळी सी लिंक येथून पोहायला सुरुवात केली. ते ७.२२ मिनिटाला तिने गेट वे ऑफ इंडिया गाठले. तिने साध्य केलेल्या या यशामागे अनेक वर्षांची मेहनत आहे. याच मेहनतीबद्दल तिचे वडील नंदकिशोर भराडिया यांनी 'नवशक्ती'शी बोलताना अनेक गोष्टींचा खुलासा केला.

हे लक्ष्य गाठण्यासाठी काय मेहनत घेतली?

मागील १० वर्षांपासून कीर्ती सोलापूरमध्ये पोहण्याचे प्रशिक्षण घेत आहे. २ वर्षांपूर्वी तिने सोलापूरच्या एका स्विमिंगपूलमध्ये न थांबता तब्बल १२ तास १५ मिनिटं म्हणजेच अंदाजे ३४.५ किमी पोहत एक विक्रम केला होता.

संकटांवर कशी मात केली?

कोरोनाकाळात कीर्ती तब्बल २ वर्षे सरावापासून अलिप्त राहिली होती. त्यानंतर अंदाजे फेब्रुवारी-मार्च दरम्यान तिला सरावासाठी स्विमिंगपूल उपलब्ध झाला. परंतु, यावेळी तिचा फक्त २० टक्केच स्टॅमिना उरला होता. त्यानंतर तिने रोज सरावासाठी वेळ देण्याचा निश्चय केला. मग तिने दिवसातून ८ ते १२ तास सराव सुरु ठेवला. जेव्हा तिचा सराव पूर्ण झाला, त्यावेळेस तिने ३७ किमी पोहण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले होते. समुद्रामधील अडचणींवर मात करण्यासाठी ती मागच्या दीड महिन्यांपासून समुद्रातदेखील सराव करत होती. यावेळी समुद्रामध्ये पोहताना काय अडचणी येऊ शकतात? हे समजून घेतले. त्याप्रकारे तिच्या सरावाचे नियोजन केले.

आहारावर सर्वाधिक लक्ष

हा टप्पा गाठण्यासाठी आहारावर सर्वाधिक लक्ष दिले आणि यामध्ये १०० टक्के फक्त शाकाहारी अन्नच तिला देण्यात आले होते. त्यामध्ये फळे, ड्रायफ्रुट, चीज, पनीर, हिरव्या पालेभाज्या, नाचणी गुळाचे लाडू, मोड आलेली कडधान्य अशा विविध प्रकारांचा समावेश तिच्या आहारामध्ये होता. यामुळेच तिचा स्टॅमिना तयार झाला होता.

श्रीलंका ते भारत असा विक्रम रचण्याचे ध्येय

कीर्तीचे पुढील ध्येय हे श्रीलंका ते भारत असे अंतर गाठणे हे असणार आहे. यामागे तिची संकल्पना अशी असेल की, भारतात आपली माणसं राहतात म्हणून पोहण्याची सुरुवात श्रीलंकापासून करणार तर शेवट हा भारतात करणार आहे. हे ध्येय धरूनच आता पुढची वाटचाल करणार असल्याचे तिचे वडील नंदकिशोर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in