
पेण : पाच व सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करून मुंबईकडे निघालेल्या गणेशभक्तांचे परतीच्या प्रवासात मोठे हाल झाले. चार ते साडे चार तास आपल्या वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना वातानुकूलित गाडीमध्ये घाम फुटला.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे पळस्पे ते नागोठणेपर्यंत रुंदीकरण होऊनही मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरचा वाहतूक कोंडीचा विळखा दूर होत नाही. गणेशोत्सव हा कोकणातील महत्वाचा सण आहे. सात दिवसांच्या बाप्पाला मंगळवारी निरोप देऊन चाकरमानी मुंबईच्या दिशेने निघाले. चाकरमानी आणि प्रवासी त्यांची चारचाकी, दुचाकी वाहने, खासगी प्रवासी वाहने, एसटी बसेस व अवजड मालवाहू वाहनांची तुफान गर्दीच राष्ट्रीय महामार्गावर आहे. त्यात भरीस भर म्हणून पेण येथील ईरवाडी गावाजवळ एसटी बस बंद पडल्याने महामार्गावर ईरवाडी ते रामवाडी दरम्यान सुमारे ३ किलोमीटर वाहनाच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या. मात्र वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे बंद पडलेली बस बाजूला केल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी फुटली.
चार तास गाडी बसण्याची शिक्षा भोगावी लागल्याने प्रवाशी वैतागले होते. त्यातच कुर्मगतीने चालणाऱ्या गाड्यांमुळे अनेकांचा संताप अनावर होत होता. या वाहतूक कोंडीत ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांचे हाल झाले. त्यातच महामार्गावर पडलेल्या खड्डयांमुळे वाहतुकीचे तीन तेरा वाजले होते. वाहतूक पोलीस, वॉर्डन यांनाही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नाकीनऊ येत होते.
संगमेश्वर येथेही प्रचंड वाहतूक कोंडी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेले सोनवी पुलाचे काम संगमेश्वर-देवरुख मार्गालाही अडथळा ठरत आहे. यामुळे चाकरमान्यांना प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. बुधवारी सकाळपासूनच संगमेश्वर ते नवनिर्माण महाविद्यालय दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. सोनवी पुलाचे काम अनेक महिन्यांपासून रखडले असून, पर्यायी मार्गांच्या अपुऱ्या नियोजनामुळे आणि वाढलेल्या वाहतुकीमुळे संगमेश्वर-देवरुख मार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. स्थानिक प्रशासन आणि वाहतूक विभागाने तत्काळ उपाययोजना करून मार्ग मोकळा करण्याची मागणी नागरिक आणि प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
संगमेश्वर सोनवी चौक येथे संगमेश्वर पोलीस तसेच वाहतूक पोलीस तैनात होते. मात्र सोनवी पूल ते गणेश कृपा हार्डवेअरपर्यंत एकेरी मार्ग असल्यामुळे पोलिसांना वाहतूक सुरळीत करताना मनस्ताप सहन करावा लागला. बुधवारी सकाळपासून संगमेश्वर-देवरुख मार्गावर मुंबईकडे परतणारी अनेक वाहने आल्यामुळे संगमेश्वर सोनवी चौक येथील वाहतूककोंडीचा फटका या वाहनांना बसला आहे.