गोकुळचा वाद शिगेला! 'गोकुळ'ला 'अमूल'च्या घशात घालण्याचे षडयंत्र - सतेज पाटील; कोल्हापुरात सोमवारी ‘संघर्ष मोर्चा’

निवडणुकीत मिळालेला जनाधार डावलून राज्य सरकारने गोकुळवर ४ शासननियुक्त (स्वीकृत) संचालक लादण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
गोकुळचा वाद शिगेला! 'गोकुळ'ला 'अमूल'च्या घशात घालण्याचे षडयंत्र - सतेज पाटील; कोल्हापुरात सोमवारी ‘संघर्ष मोर्चा’
गोकुळचा वाद शिगेला! 'गोकुळ'ला 'अमूल'च्या घशात घालण्याचे षडयंत्र - सतेज पाटील; कोल्हापुरात सोमवारी ‘संघर्ष मोर्चा’
Published on: 

मुंबई/कोल्हापूर : निवडणुकीत मिळालेला जनाधार डावलून राज्य सरकारने गोकुळवर ४ शासननियुक्त (स्वीकृत) संचालक लादण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या वादात उडी घेतल्यामुळे हा वाद आता आणखी पेटण्याची चिन्हे आहेत. ९ तारखेला कोल्हापूर येथे दसरा चौक येथून ‘संघर्ष मोर्चा’ काढण्याची घोषणा काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केली.

‘कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत दिलेला कौल नाकारण्याचे पाप करत गोकुळवर कब्जा मिळवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने पाच अशासकीय संचालक नेमण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. लोकशाही संपवून शेतकऱ्यांचा हा गोकुळ संघ अमूलच्या घशात घालण्यासाठी सर्व खटाटोप चालला आहे’, असा आरोप काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी येथे केला.

गोकुळच्या पदार्थांवर ‘अमूल’चे लेबल

‘मी येताना गोकुळचे गुलाबजाम आणि श्रीखंड आणणार होतो. पण गडबडीत ते राहून गेले. कारण गोकुळ या नावाचे पदार्थ शेवटचेच पाहून घ्या, उद्या त्यावर अमूलचे लेबल लावून गोकुळ संस्था त्यांच्या घशात घातली जाईल’, असा दावाही सतेज पाटील यांनी केला.

सत्ता मिळवण्यासाठीच सुधारणा

‘राज्य सरकारने सहकार कायद्यात केलेल्या बदलातून साखर कारखाने आणि जिल्हा बँकांना वगळण्यात आले आहे. फक्त गोकुळमधील सत्ता मिळवण्यासाठी ही सुधारणा करण्यात आली आहे. ही सुधारणा गोकुळपुरती मर्यादित राहणार नसून उद्या ती कोणत्याही संस्थेसाठी लागू होऊ शकते. मुंबईत ‘एसआरए’ प्रकल्पांच्या गृहनिर्माण संस्थांमध्ये असे शासकीय सदस्य नियुक्त करून प्रकल्पावर कब्जा केला जाऊ शकतो,’ अशी भीती सतेज पाटील यांनी व्यक्त केली.

मुश्रीफ, चंद्रकांत पाटलांचाच कट

गोकुळवर साडेपाच लाख शेतकऱ्यांचा संसार चालतो. दररोज २० लाख लिटर दुधाचे संकलन होते आणि शेतकऱ्यांच्या कष्टापोटी दर १० दिवसाला १०० कोटी रुपये दिले जातात. ही संस्था शेतकऱ्यांच्या मालकीची असतानाही भाजप सरकार, मंत्री हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांनी कट करून हा डाव खेळल्याचा आरोप पाटील यांनी केला.

शिवसेना तुमच्या पाठीशी - उद्धव ठाकरे

गोकुळ वाचवण्यासाठी आणि लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत आहोत. साडेपाच लाख शेतकऱ्यांचा जनादेश चिरडण्याचा हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. ही केवळ एका दूध संघाची निवडणूक नसून महाराष्ट्रातील सहकार आणि लोकशाही वाचवण्याची लढाई आहे. या लढ्यात शिवसेना ठाकरे पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

माजी सरन्यायाधीशांचा सल्ला

गोकुळमधील नवनिर्वाचित बहुमताला सत्तास्थापनेपासून रोखण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेश आणून तज्ज्ञ आणि शासकीय स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार दिल्यास तो संविधानाच्या चौकटीत टिकणार नाही, असा कायदेशीर सल्ला देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिला आहे. असा अध्यादेश म्हणजे मनमानी कारभार आणि अधिकारांचा गैरवापर ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. गोकुळच्या एका संचालकाने विनंती पत्र लिहून याबाबत गवई यांच्याकडून सल्ला मागितला होता.

गोकुळमध्येही मतचोरी - राहुल गांधी

काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गोकुळ प्रकरणाची गंभीर दखल घेत भाजपवर टीका केली आहे. ‘गोकुळमध्ये दूध उत्पादकांनी भाजपला हरवले. त्यामुळे भाजपने निवडणुकीनंतर नियम बदलले. ४ संचालक नव्याने घुसवले, १२ चे १६ केले आणि बहुमत चोरले. ही दूध उत्पादकांच्या मतांची चोरी आहे, हा जनादेशातील भेसळ करण्याचा प्रकार आहे. भाजप आता इतका हताश झाला आहे की, प्रत्येक ठिकाणी आपली सत्ता वाचवण्यासाठी ते कोणत्याही थराला जायला तयार आहेत. दूध उत्पादकांच्या मतांची चोरी करणाऱ्यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी, शेतकरी हे कधीच विसरत नसतो’, अशा शब्दांत त्यांनी भाजपला धारेवर धरले.

दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा

सरकारचा निर्णय हा कोल्हापूरकरांचा अपमान असून महायुतीच्या या निर्णयाला न्यायालय आणि रस्त्यावर उतरून कडाडून विरोध केला जाणार असल्याचे पाटील म्हणाले. येत्या सोमवारी ९ नोव्हेंबर रोजी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ‘संघर्ष मोर्चा’ काढण्यात येणार आहे. गोकुळशी जोडलेल्या ५,४०० प्राथमिक दूध संस्थांचे प्रतिनिधी आणि हजारो दूध उत्पादक शेतकरी या मोर्च्यात रस्त्यावर उतरणार आहेत.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)