

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमधील सत्तासंघर्ष आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. गोकुळ दूध संघावरील शासनाच्या हस्तक्षेपाविरोधात आणि ४ अतिरिक्त संचालकांच्या नियुक्तीविरोधात सोमवारी कोल्हापुरात काढण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या 'संघर्ष मोर्चा'त सत्ताधारी सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. मात्र गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला मंगळवारी लागणार आहे. सरकारनियुक्त चार संचालक तसेच महायुतीचे १२ संचालक कुणाच्या पारड्यात मत टाकणार आणि गोकुळची सत्ता कुणाच्या हाती जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गोकुळ दूध संघाची निवडणूक मंगळवारी १० नोव्हेंबरला होणार आहे. यामध्ये निवडून आलेल्या २५ संचालकांसोबतच शासनाने नियुक्त केलेले चार संचालकही मतदानाचा हक्क बजावतील. मात्र या चार संचालकांची मते बाजूला ठेवली जाणार आहेत. याबाबतचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. मंगळवारी होणाऱ्या या अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत पारदर्शकता राहावी, यासाठी संपूर्ण मतदान प्रक्रियेची व्हिडिओग्राफी केली जाणार आहे. विशेष म्हणजे, मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच मतमोजणी होऊन निकालही जाहीर केला जाणार असून गोकुळचा नवा अध्यक्ष उद्याच निवडला जाईल.
शिरगाव येथील प्रधान कार्यालयात निवड सभा
गोकुळच्या अध्यक्षपदासाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता शिरगाव येथील प्रधान कार्यालयात निवड सभा होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडेल. गोकुळमध्ये राजर्षी शाहू समविचारी आघाडीकडे १३ तर महायुतीकडे १२ संचालक आहेत. दरम्यान, सोमवारी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील दसरा चौकातून सुरू झालेला हा संघर्ष मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी, महिला, कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदवला. गायी, म्हशी आणि बैलांसह सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी या मोर्चाकडे राज्याचे लक्ष वेधून घेतले.
मोर्चात सरकारच्या निर्णयावर हल्लाबोल
या मोर्चात खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, खासदार विशाल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार विश्वजीत कदम, विवेकानंद पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व करणारे आमदार सतेज पाटील यांनी आपल्या भाषणात राज्य सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली. गोकुळच्या निवडणुकीत दूध उत्पादकांनी दिलेला कौल स्वीकारण्याऐवजी शासननियुक्त संचालकांच्या माध्यमातून संस्थेची सत्ता मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. मंत्री हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी गोकुळमधील महायुतीच्या काही संचालकांशी आपली चर्चा झाल्याचा दावा केला. 'तिकडचे १२ संचालक आत आले तर ते आपले राहणार नाहीत, अशी सत्ताधाऱ्यांना भीती आहे. ते १२ जण आत आले आणि समोर बसले तर दुसऱ्या-तिसऱ्या बैठकीनंतर बंटी पाटलांचे १७ होतील. कारण तिकडेही हे जे चालले आहे ते योग्य नाही, असे समजणारी मंडळी आहेत. माझ्याशी त्यांनी चर्चा केली आहे', असे जयंत पाटील म्हणाले.
कोल्हापुरी पायताण, म्हैस, बैलगाडी, ट्रॅक्टर
गोकुळमधील सत्तासंघर्षामुळे कोल्हापूरसह राज्य, देशपातळीवरील वातावरण तापले आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या वतीने संघर्ष मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.