
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा आणि इतिहासकार इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणारा प्रशांत कोरटकर याच्यावर शुक्रवारी न्यायालयातील सुनावणी संपल्यानंतर काही वकिलांनी हल्ला केला. या हल्ल्यात कोरटकर किरकोळ जखमी झाला आहे.
कोरटकर याला अटक केल्यानंतर शुक्रवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे न्यायालयात आणण्यात आले होते. कोरटकर याला पाच दिवसांची कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती, मात्र न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
न्यायालयातील सुनावणी संपल्यानंतर काही वकिलांनी अचानक कोरटकर याच्यावर हल्ला केला. हल्ला करणाऱ्या वकिलांनी "छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतोस का", असे विचारत त्याला लक्ष्य केले. या हल्ल्यात कोरटकर याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे.
हल्लेखोर वकील ताब्यात
या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. हल्ला करणाऱ्या वकिलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, हल्ला करणारे खरे वकील होते का, याबाबतही चौकशी सुरू आहे. न्यायालय परिसरात अशा प्रकारची घटना घडल्याने न्यायालयाच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.