

कराड : येथून जात असलेल्या कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावरून व कर्नाटकातील मिरज-बंगळुरू रेल्वे मार्गावरून पुणे, मुंबईकडे व परत धावणाऱ्या बहुतेक सर्वच एक्स्प्रेस गाड्यांमध्ये गोर-गरिबांसाठी कमी प्रवास दरात प्रवास करता यावा यासाठी विना आरक्षित असलेल्या जनरल डब्यात पार्सल व कुरिअर कंपन्यांच्या बेकायदा पार्सल गाठोड्यांमुळे व गठ्ठानमुळे प्रवाशांची बसण्याची बाके व्यापली जात असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
या मार्गावरील सर्वच एक्सप्रेस गाड्यांमध्ये हीच स्थिती असल्याने पुण्या,मुंबईकडे अथवा अन्य ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तिकीट काढूनही या डब्यांत बसण्यासाठी जागा न मिळाल्याने त्यांना उभे राहून प्रवास करावा लागत आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या जनरल डब्यातच अशा कंपन्यांचे बेकायदा पार्सल ठेवण्यात आल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून रेल्वे प्रशासनाने पार्सलवाल्यांबाबत कठोर धोरण अवलंबत प्रवाशांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी होत आहे.
येथून जात असलेल्या रेल्वे मार्गावरून ये-जा करणाऱ्या बहुतेक सर्वच एक्सप्रेस रेल्वे गाड्यांच्या जनरल डब्यात मोठ्या प्रमाणावर पार्सल ठेवण्यात येत असल्याने व दरोजचाच हा बेकायदा 'उपक्रम' संबंधित पार्सल व कुरिअर कंपन्यांचा सुरु असल्याने प्रवाशांची बसण्याची उपलब्ध जागा कमी होत आहे.त्यातच या मार्गावरील सर्वच स्थानकांवर प्रवाशांची आधीच गर्दी असल्याने या डब्यात पार्सलनीच बसण्याची जागा व्यापल्याने प्रवाशांची मोठी कोंडीही होत आहे.यामध्ये वृद्ध,महिला,लहान मुले यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असते.
ॲडजस्ट करण्याचा सल्ला
या प्रकाराबाबत प्रवाशांनी उपस्थित रेल्वे सुरक्षा बलच्या जवानांकडे तक्रार केली. मात्र, दरवेळेसचा हा प्रकार आहे, तुम्ही एकमेकांना अॅडजस्ट करून प्रवास करा, आमच्या हातात काही नाही,असे सांगण्यात आल्याचा आरोपही प्रवाशांनी केला आहे. या प्रकाररांचे - मोबाइलवर चित्रीकरण करणाऱ्या कोरेगावातील एका प्रवाशाचा मोबाइल पार्सल विभागातील अधिकाऱ्याने हिसकावल्याचा आरोपही प्रवाशांनी केला आहे.