

कोल्हापूर : गडहिंग्लज, चंदगड व आजरा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ‘घड्याळ’ या समान चिन्हावर एकत्र लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. याबाबत माजी आमदार राजेश पाटील आणि डॉ. सौ. नंदाताई बाभुळकर यांच्यात यशस्वी समझोता झाला असून, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी उमेदवारांच्या विजयाचा निर्धार करण्यात आला आहे.
८ झेडपी आणि १६ पंचायत समित्यांवर संयुक्त उमेदवार
आठ जि.प. व १६ पं.स. मतदारसंघात संयुक्त उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला. कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन माजी आमदार राजेश पाटील व डॉ. नंदाताई बाभुळकर यांनी संयुक्त निर्णयावर शिक्कामोर्तब केले. मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गडहिंग्लज, चंदगड व आजरा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येत आहेत. हा राज्यातील पहिला प्रयोग असून, माजी आमदार राजेश पाटील आणि डॉ. नंदाताई बाभुळकर यांचे याबद्दल अभिनंदन.
माजी आमदार राजेश पाटील म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली मी आणि डॉ. नंदाताई बाभुळकर एकत्र आलो आहोत. गडहिंग्लज, चंदगड व आजरा तालुक्यातील आठ जिल्हा परिषद व १६ पंचायत समिती मतदारसंघात ‘घड्याळ’ चिन्हावर उमेदवार लढवण्याबाबत एकमत झाले आहे. चंदगड नगरपंचायत निवडणुकीत हा प्रयोग यशस्वी ठरला असून, त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत. शाहू-फुले-आंबेडकर विचारधारा पुढे नेत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा उंचावू.
मनामनात 'घड्याळ'
डॉ. नंदाताई बाभुळकर म्हणाल्या, चंदगड नगरपंचायतीच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आणण्याचा पहिला प्रयोग केला आणि त्याला यश मिळाले. शरद पवारसाहेब व प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची अनुमती घेण्यात आली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी समन्वय साधून चर्चा घडवून आणल्या. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सक्षम व ताकदवान पॅनल उभे केले आहे, असे त्यांनी सांगितले. कै. बाबासाहेब कुपेकर साहेबांपासून राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हे चिन्ह जनतेच्या मनामनात रुजलेले आहे. म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून एकत्रित ताकदीने या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत,” असेही डॉ. बाभुळकर म्हणाल्या.