Kolhapur : पंचगंगेने इशाऱ्याची पातळी ओलांडली ; अनेक बंधारे पाण्याखाली

कोल्हापुरातील २४ राज्य महामार्गापैकी १५ आणि १२२ प्रमुख जिल्हा मार्गापैकी ५१ बंद झाले आहेत
Kolhapur : पंचगंगेने इशाऱ्याची पातळी ओलांडली ; अनेक बंधारे पाण्याखाली

कोल्हापूरात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणाच्या पानलोट क्षेत्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीने आज (२४ जुलै) पहाटेच्या सुमारास इशाऱ्याची पातळी गाठली. पंचगेगेची इशारा पातळी ही ३९ फूट, तर धोक्याची पातळी ही ४३ फुट आहे. आज पहाटेच्या सुमारास कोल्हापुरातली राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पातळी ही ३९ फूट ६ इंच इतकी झाली. पावसाचा जोर असाच कायम राहील्यास पंचगंगा आजच धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता आहे.

पंचगंगेची पाणी पातळी वाढू लागल्याने नदीकाठच्या गावांना आजच इशारा देण्यात आला आहे. सर्वाधिक फटका बसणाऱ्या करवीर तालुक्यातील आंबेवाडी आणि चिखलीमध्ये स्थलांतर सुरु करण्यात आलं आहे. तसंच कोल्हापूर शहरातील पूरबाधित भागांमध्येही स्थलांतर सुरु करण्यात आलं आहे.

कोल्हापूर जिल्ह्याती सर्वदूर सुरु असलेल्या पावसामुळे विविध नद्यांवरील कोल्हापूर पद्धतीचे ८३ बंधारे पाण्याखाली गेली आहेत. यामुळे थेट संपर्क तुटल्याने अन्य मार्गाने वाहतूक सुरु आहे. कोल्हापुरातील २४ राज्य महामार्गापैकी १५ आणि १२२ प्रमुख जिल्हा मार्गापैकी ५१ बंद झाले आहेत. या मार्गावरुन गावांना जोडणारे सुमारे चारशेपेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला आहे. करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथील ८० जनावरे आणि १२५ लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.

दमदार सुरु असलेल्या पावसामुळे राधानगरी धरण ८८ टक्के भरले आहे. धरणाच्या पानलोट क्षेत्रात सुरु असलेल्या पावसामुळे धरण कोणत्याही क्षणी भरु शकते. सध्या भोगावती नदी पात्रात १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरण भरल्यानंतर पाणी पातळी वाढू शकते. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in