'हॅप्पी बर्थडे डॉन' रील व्हायरल झाले अन् 'आण्णा चेंबुरी'ला वाढदिवशीच पोलीस कोठडीचे गिफ्ट मिळाले

मित्रांनी 'हॅप्पी बर्थडे डॉन' म्हणून रील तयार केले होते. हाच रील व्हिडिओ व्हायरल झाला आणि पोलिसांनी चेंबुरीच्या मुसक्या आवळल्या.
'हॅप्पी बर्थडे डॉन' रील व्हायरल झाले अन् 'आण्णा चेंबुरी'ला वाढदिवशीच पोलीस कोठडीचे गिफ्ट मिळाले

कोल्हापूर : बेकायदेशीर शस्त्र बाळगत इन्स्टाग्रामवरुन फोटो, व्हिडिओ व्हायरल करुन दहशत माजवणाऱ्याला कोल्हापूर पोलिसांनी बुधवारी अटक केली. उल्लेखनीय म्हणजे बुधवारीच त्याचा वाढदिवस होता. प्रसाद राजाराम कलकुटकी उर्फ आण्णा चेंबुरी (वय २१, दौलतनगर, कोल्हापूर) असे या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून गावठी कट्टा जप्त केला आहे.

रील्स बनवून दहशत माजवणाऱ्यांवर कारवाया करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी दिले आहेत. त्यानुसार उपअधीक्षक अजित टिके यांच्या पथकाने अशा गावगुंडाच्या सोशल मीडिया अकाऊंटची तपासणी सुरु केली. यावेळी त्यांना आण्णा चेंबुरीचा पिस्तूल हाती असलेला रील व्हिडिओ दिसला. लगेच पोलिसांनी चेंबुरीचा शोध सुरु केला. तो राजारामपुरी येथील चुनेकर शाळेजवळ असल्याचे समजले. त्याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.

बुधवारी चेंबुरीचा वाढदिवस होता. त्यानिमित्त त्याच्या मित्रांनी 'हॅप्पी बर्थडे डॉन' म्हणून रील तयार केले होते. हाच रील व्हिडिओ व्हायरल झाला आणि पोलिसांनी चेंबुरीच्या मुसक्या आवळल्या. चौकशीत त्याने एका मित्राकडून पाच हजार रुपयाला गावठी कट्टा आणल्याची कबूली दिली. आता पोलिसांकडून कट्टा विकणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in