

कोल्हापूर : ऊसदराच्या प्रश्नावरून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाला आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर बुधवारी कोल्हापुरात ऊसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न झाला. यामुळे कोल्हापुरातील ऊसदराचे आंदोलन अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत कारखानदारांनी पाठ फिरवल्याने शेतकरी संतापला आहे. गेल्या काही दिवसांपासून ऊसदराबाबत कारखानदार, शेतकरी संघटना आणि प्रशासन यांच्यात संघर्षाची स्थिती आहे. अशातच मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न केल्याने आंदोलन आणखी पेटण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमासाठी बुधवारी सकाळी कोल्हापुरात आले होते. पोलीस मैदान येथील कार्यक्रम संपल्यावर त्यांच्या वाहनांचा ताफा दुपारी उजळाईवाडी विमानतळाकडे निघाला होता. पुणे-बंगळुरू महामार्गावरील एका भुयारी मार्गाखाली मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा असला असता, काही अज्ञात शेतकऱ्यांनी ऊसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ऊसाच्या कांड्यांनी भरलेली पोती रस्त्यावर टाकून आपला निषेध नोंदवला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांची तारांबळ उडाली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन ऊसाच्या कांड्या बाजूला केल्या. या घटनेमुळे काही काळ पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. विशेष म्हणजे पोलिसांचा तगडा बंदोबस्त असतानाही, शेतकऱ्यांनी आपला निषेध नोंदवला.
कोल्हापुरातील ८ कारखान्यांनी ‘एफआरपी’ थकवल्याचा आरोप
कोल्हापूर जिल्ह्यातील ८ कारखान्यांनी मागील हंगामाची एफआरपी थकवल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला होता. तसेच याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचा इशाराही दिला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता शेतकऱ्यांनी त्यांच्या दिशेने ऊसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न केला.