

कोल्हापूर : कोल्हापूरच्या उद्योग, व्यापार आणि पर्यटन क्षेत्राला मोठी गती देणारी बातमी समोर आली आहे. २९ मार्चपासून कोल्हापूर ते नवी मुंबई मार्गावर 'इंडिगो' कंपनीची विमानसेवा आठवड्यातील सातही दिवस सुरू होत आहे. विशेष म्हणजे ही सेवा सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रांत उपलब्ध होणार असल्याने प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे.
कोल्हापूरकरांना आता मुंबईतील आपली कामे आटोपून त्याच दिवशी परतणे शक्य होणार आहे. या नवीन विमानसेवेमुळे कोल्हापूर आणि मुंबईतील अंतर केवळ तासाभराचे उरले असून, पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. खासदार धनंजय महाडिक यांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता.
ठळक वैशिष्ट्ये
१) दोन सत्रांत सेवा : सकाळी मुंबईला जाऊन कामे पूर्ण करून रात्री कोल्हापुरात परतण्याची सुवर्णसंधी.
२) नवी मुंबई कनेक्टिव्हिटी : ही सेवा थेट नवी मुंबई विमानतळावरून कार्यान्वित होणार आहे.
३) तिकीट दर : या प्रवासाचे सुरुवातीचे तिकीट दर ७,६०० रुपये इतके असणार आहेत.
४) विकासाला चालना : कोल्हापूर विमानतळावर नवीन टर्मिनसचे काम सुरू असतानाच ही सेवा सुरू झाल्याने पर्यटनाला आणि स्थानिक उद्योजकांना मोठा फायदा होणार आहे.
अशा असतील फेऱ्या
१) सकाळची फेरी : नवी मुंबई सकाळी ८:०० ते कोल्हापूर सकाळी ९:१५ वाजता.
२) कोल्हापूर सकाळी ९:३५ ते नवी मुंबई सकाळी १०:३५
३) संध्याकाळची फेरी : नवी मुंबई संध्याकाळी ७:२० ते कोल्हापूर रात्री ८:३० वाजता.
४) कोल्हापूर रात्री ८:५० ते नवी मुंबई ते रात्री ९:५० वाजता
"कोल्हापूरकरांची ही अनेक वर्षांपासूनची मागणी होती. सोयीस्कर वेळेतील या विमानसेवेमुळे मुंबई-कोल्हापूर प्रवास अधिक सुखकर होईल आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात भर पडेल." - धनंजय महाडिक, खासदार