
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल कोल्हे हे नाटकाच्या प्रयोगादरम्यान जखमी झाले. 'शिवपुत्र संभाजी' नाटकाच्या प्रयोगावेळी एक प्रवेश घेत असताना सदर घटना घडली. अमोल कोल्हे यांनी एक व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिली असून डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
'शिवपुत्र संभाजी' नाटकाच्या चालू प्रयोगात घोड्यावरून एंट्री घेताना अमोल कोल्हे जखमी झाले. घोड्याचा मागचा पाय अचानक दुमडला गेल्याने कोल्हे यांच्या कंबरेत चमक गेली. यामुळे त्यांच्या मणक्याला देखील दुखापत झाली आहे. त्यांना लगेच घोड्यावरून खाली उतरवण्यात आले. अशा परिस्थितीतही अमोल कोल्हे यांनी प्रथमोपचार व औषधे घेऊन प्रयोग सुरूच ठेवला. प्रयोगानंतर, त्यांनी उपस्थित प्रेक्षकांना त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितले. अमोल कोल्हेच्या दुखापतीनंतर कराडमधील 'शिवपुत्र संभाजी' नाटकाचा पुढील प्रयोग रद्द करण्यात आला आहे. १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित या नाटकाचा प्रयोग कराडमधील शेवटचा प्रयोग असल्याची माहिती अमोल कोल्हे यांनी दिली आहे.