

रत्नागिरी : गेल्या १८ वर्षांपासून काम सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेमुळे संतप्त कोकणवासीयांनी रविवारी महामार्ग रोखून संताप व्यक्त केला.
संगमेश्वरमधील सोनवी पुलाजवळ मुंबई-गोवा महामार्ग रोखण्यात आला. त्याचा मोठा परिणाम वाहतुकीवर झाला. मुंबई-गोवा महामार्गावरील खराब रस्त्यामुळे हजारो जणांचा बळी आतापर्यंत गेला आहे. या महामार्गाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून आणखी किती बळी घेणार, असा सवाल संतप्त आंदोलकांनी केला.
सरकार आणि संबंधित यंत्रणांच्या उदासीनतेविरोधात संताप व्यक्त करत आंदोलकांनी जोरदार निषेध केला. हा महामार्ग म्हणजे कोकणाचा मृत्युमार्ग बनत आहे. अनेक तास महामार्ग ठप्प झाल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या किलोमीटरभर रांगा लागल्या होत्या.
त्यामुळे प्रवासी, रुग्णवाहिका, मालवाहतूक वाहनांचे हाल झाले. मात्र आंदोलकांनी यासाठी प्रशासनालाच जबाबदार धरले. ‘वेळेवर काम झाले असते, तर आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आली नसती,’ अशी तीव्र भावना नागरिकांतून व्यक्त होत होती.
परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच उपविभागीय अधिकारी निलेश माईणकर आणि पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
कोल्हापूर सर्किट खंडपीठात आज सुनावणी
जिल्ह्यातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेची मागणी करणारी जनहित याचिका कोल्हापूर सर्किट खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गवाणकर यांनी ॲड. असिम सरोदे, ॲड. श्रेया आवले यांच्यातर्फे ही याचिका दाखल करण्यात आली आहे. बांधकाम विभाग, नगरपरिषद, जिल्हाधिकारी व नगरविकास विभाग यांना प्रतिवादी केले आहे. या याचिकेची प्राथमिक सुनावणी उद्या होणार आहे.