आंब्याच्या बागा उद्ध्वस्त होणार; ३ जुलै रोजी जलसमाधी आंदोलन करणार- राजू शेट्टी

यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा फळबागांचे, आंबा बागांचे नुकसान झाले, तसेच अपेक्षित उत्पन्नही मिळालेले नाही. कोकणातील शेतकऱ्यांना प्रतिकलम २२० रूपये नुकसानभरपाई देऊन आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम शासनाने केले आहे.
आंब्याच्या बागा उद्ध्वस्त होणार; ३ जुलै रोजी जलसमाधी आंदोलन करणार- राजू शेट्टी
आंब्याच्या बागा उद्ध्वस्त होणार; ३ जुलै रोजी जलसमाधी आंदोलन करणार- राजू शेट्टी
Published on

सिंधुदुर्ग : यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा फळबागांचे, आंबा बागांचे नुकसान झाले, तसेच अपेक्षित उत्पन्नही मिळालेले नाही. कोकणातील शेतकऱ्यांना प्रतिकलम २२० रूपये नुकसानभरपाई देऊन आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम शासनाने केले आहे. मोर्चा, आंदोलने करूनही हे मुर्दाड सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत नाही. कोकणच्या पर्यावरणाचे संतुलन आधीच बिघडलेले असताना सरकारने देवगड येथे ‘अणुऊर्जा प्रकल्प’ प्रस्तावित केला आहे. हा प्रकल्प झाल्यास कोकणात शिल्लक राहिलेली आंबा, काजूची बागायती नाहीशी होऊन जाईल. कोकणचा कॅलिफोर्निया नव्हे, कोकणचे राजस्थान होईल. सरकार न्याय देणारच नसेल तर जलसमाधी घेऊनच आम्ही आमचा शेवट करून घेऊ, अशी टोकाची भूमिका आता शेतकऱ्यांनी घेतली आहे.

त्यामुळे येत्या ३ जुलैला देवगड येथे होणाऱ्या जलसमाधी आंदोलनात सर्वांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले आहे.

गेल्या चार महिन्यांपासून कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी सरकारकडे मदतीची अपेक्षा व्यक्त करतो आहे. वातावरणातील झालेल्या बदलांमुळे आंब्याला फळधारणा झाली नाही. काजूचीही तीच अवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत नैसर्गिक आपत्ती समजून राज्य व केंद्र सरकारने आपत्ती व्यवस्थापन निधीमधून भरीव निधी देणे गरजेचे होते.

विमा कंपन्यांनीही विम्याची भरघोस मदत शेतकऱ्यांना मिळवून देणे गरजेचे होते. परंतु केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांना न्याय दिला नाही व विमा कंपन्यांनीही शेतकऱ्यांना न्याय दिला नाही असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

देवगड तालुक्यात आता अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित असून हा प्रकल्प झाल्यास देवगडच्या पर्यावरणाचे वाटोळे होईल. आधीच पर्यावरणाचे संतुलन बिघडल्याने आंब्याचे उत्पादन येईनासे झालेले आहे. भविष्यात ते पूर्णपणे उद‌्ध्वस्त होईल. अशा परिस्थितीत अणुऊर्जा प्रकल्प येथे आला, तर कोकणच्या शेतकऱ्याने आता आंबा, काजू, कोकम ही पिके आता विसरून जायला हवीत असे सांगून शेट्टी म्हणाले, एकतर भातशेती संपल्यात जमा आहे. कोकणात जी शेती शिल्लक आहे, ती आंबा, काजूची आहे. तेही पीक नाहीसे झाले, तर संपूर्ण कोकण ओसाड होईल अशी भितीही राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.

कोकणवासीयांनी एकत्र यावे

कोकणचा कॅलिफोर्निया करायचे सोडाच, कोकणचा राजस्थान होईल. ज्याचे कोकणवर नितांत प्रेम आहे, मग तो मुंबईत राहणारा असो.. की कोकणात राहणारा असो.. ही कोकणची भूमी अशीच हिरवीगार राहिली पाहिजे, असं ज्याला वाटते, त्याने ३ जुलै रोजी सकाळी १० वाजता देवगड येथे यावे. हे सरकार आम्हाला न्याय देणार नसेल, तर जलसमाधी घेऊनच आम्ही आमचा शेवट करून घेऊ, अशी टोकाची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. ‘गड्या तू एकटा नाहीस, आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत’ या संदेशातून शेतकऱ्यांच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहनही शेट्टी यांनी केले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in