कोकण, पुण्यात ‘ऑरेंज अलर्ट’; कुंडलिका, पाताळगंगा नद्या धोक्याच्या पातळीजवळ

मुंबईसह ठाण्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी भागांत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. पावसाच्या जोरदार सरी बरसत असल्याने कुंडलिका, पाताळगंगा, सूर्या, उल्हास, सावित्री नदी धोक्याच्या पातळीजवळ वाहत असून परिसरातील गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोकण, पुण्यात ‘ऑरेंज अलर्ट’; कुंडलिका, पाताळगंगा नद्या धोक्याच्या पातळीजवळ
Published on

मुंबई : मुंबईसह ठाण्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी भागांत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. पावसाच्या जोरदार सरी बरसत असल्याने कुंडलिका, पाताळगंगा, सूर्या, उल्हास, सावित्री नदी धोक्याच्या पातळीजवळ वाहत असून परिसरातील गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अधूनमधून जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, पुणे घाट, सातारा घाट परिसरात पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोकण किनारपट्टीला बुधवार, २५ जून रोजी रात्री ८.३० वाजेपर्यंत उंच लाटा उसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, ठाणे, पुणे जिल्ह्यांत पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने दोघांचा, तर खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

यंदा वरुणराजाचे वेळेआधीच आगमन झाले असले तरी गेल्या १५ दिवसांपासून मुंबई, ठाणे, पुणे आदी जिल्ह्यांत पावसाने दडी मारली आहे. मात्र पालघर, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे या ठिकाणच्या नद्या ओसंडून वाहत आहेत.

२४ तासांत तिघांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यात पुरात वाहून गेल्याने एकाचा, तर खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यात नदीत वाहून एका व्यक्तीने जीव गमावला असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सांगण्यात आले.

पालघर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस

मागील २४ तासांमध्ये (२३ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) पालघर जिल्ह्यात ७३.३ मिमी पाऊस झाला आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३६.४ मिमी, रत्नागिरी जिल्ह्यात २५.८ मिमी, ठाणे जिल्ह्यात १४.३ मिमी आणि कोल्हापूर जिल्ह्यात १३.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in