कोकण रेल्वेच्या दुपरीकरणासाठी ५,१०० कोटींचा खर्च ; ‘केआरसीएल’चे अध्यक्ष संतोष कुमार झा यांची माहिती

कोकण रेल्वेचा संपूर्ण मार्ग हा एकेरी असून सध्या दुपरीकरणासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कोकण रेल्वेच्या संपूर्ण दुपरीकरणासाठी...
कोकण रेल्वेच्या दुपरीकरणासाठी ५,१०० कोटींचा खर्च ; ‘केआरसीएल’चे अध्यक्ष संतोष कुमार झा यांची माहिती
Published on

मुंबई : कोकण रेल्वेचा संपूर्ण मार्ग हा एकेरी असून सध्या दुपरीकरणासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कोकण रेल्वेच्या संपूर्ण दुपरीकरणासाठी ५,१०० कोटींचा खर्च अपेक्षित असून त्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या मदतीची गरज भासणार आहे, अशी माहिती ‘कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड’चे (केआरसीएल) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी दिली.

सद्य:स्थितीत कोकण रेल्वेवर २,७५० कोटींचे कर्ज असून यंदाच्या आर्थिक वर्षात त्यापैकी ६०० कोटींचे कर्ज फेडले जाईल. कोकण रेल्वेही कोरोनाच्या दोन वर्षांचा अपवाद वगळता नेहमीच नफ्यात राहिली आहे. कोकण रेल्वेने २०२३-२४ साली ३०१ कोटींचा निव्वळ नफा कमावला. ‘केआरसीएल’ने गेल्या १५ वर्षांत ३,१५० कोटींच्या निविदा काढल्या असून जवळपास ४,०८७ कोटींचे कामे सुरू आहेत, असेही झा यांनी सांगितले.

कोकण रेल्वेवरील ११ स्थानकांचा विकास करण्यात येणार असून त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ९९ कोटी रुपये खर्च केले आहेत. तसेच सध्या रत्नागिरी स्थानकात प्रवाशांना सोयीसुविधा उभारण्याकरिता ३९ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. या वर्षअखेरीस रत्नागिरी स्थानकाचा पूर्णपणे कायापालट केला जाणार आहे, असेही ते म्हणाले.

कोकण रेल्वेची आता कारसाठी ‘रो-रो’ सेवा

आगामी गणेशोत्सव आणि होळीसारख्या मोठ्या सणांच्या पार्श्वभूमीवर कोकणात गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी आता हलक्या चारचाकी वाहनांसाठीही कोकण रेल्वेचा ‘रो-रो’ सेवा सुरू करण्याचा विचार आहे. ट्रेनची तिकिटे फुल्ल, रस्त्यांची वाईट अवस्था आणि वाहतूककोंडी यामुळे अनेक जण कोकणात जाण्यासाठी स्वत:च्या वाहनांचा पर्याय निवडतात. पण आता त्यांना कोकण रेल्वेच्या ‘रो-रो’ सेवेचा मोठा फायदा होणार आहे. ही सेवा कार्यान्वित झाल्यानंतर प्रवाशांना आपली कार रेल्वेमार्गे थेट कोकणातील जवळच्या स्थानकापर्यंत नेता येईल. त्यानंतर स्थानकावर पोहोचल्यावर ते आपल्या मूळ गावी कारने सहज जाऊ शकतील.

भारतीय रेल्वेचा तिकीटविक्रीचा विक्रम, एका मिनिटांत विकली ३१,८१४ तिकिटे

भारतीय रेल्वेने तिकीटविक्रीच्या बाबतीत महत्त्वपूर्ण टप्पा गाठत एका मिनिटांत तब्बल ३१,८१४ तिकीटे विकल्याचा राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला. २२ मे २०२५ रोजी एका मिनिटात जवळपास ३२ हजार तिकीटे विकल्याची माहिती केंद्र सरकारने बुधवारी दिली. तिकीट प्रक्रियेत निष्पक्षता आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी रेल्वेने वापरकर्त्यांसाठी नवीन आचारसंहिता लागू केली आहे. त्याचेच परिणाम सध्या दिसून येत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in