
नवी मुंबई : आगामी गणेशोत्सव आणि होळीसारख्या मोठ्या सणांच्या पार्श्वभूमीवर कोकणात गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी कोकण रेल्वेकडून एक दिलासादायक निर्णय घेण्यात येत आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने ट्रक आणि अवजड वाहनांप्रमाणेच आता हलक्या चारचाकी वाहनांसाठीही ‘रो-रो’ सेवा सुरू करण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे.
गणेशोत्सव आणि होळीच्या काळात कोकणात जाणाऱ्यांची संख्या प्रचंड असते. अनेक कोकणवासी आपल्या खासगी कारने गावी जाण्याचा पर्याय निवडतात. मात्र रस्त्यांची खराब अवस्था, वाहतूककोंडी आणि पावसाळी अडचणी यामुळे त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत कोकण रेल्वेच्या ‘रो-रो’ सेवेचा मोठा फायदा होणार आहे. ही सेवा कार्यान्वित झाल्यानंतर प्रवासी आपली कार रेल्वेमार्गे थेट कोकणातील जवळच्या स्थानकापर्यंत घेऊन जाऊ शकतील. त्यानंतर स्थानकावर पोहोचल्यावर ते आपल्या मूळ गावाकडे कारने सहज जाऊ शकतील. यामुळे मुंबई-कोकण मार्गावरील वाहतूककोंडीत लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे.
कोकण रेल्वेची मार्गिका माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली यांसारख्या अनेक महत्त्वाच्या स्थानकांवरून जाते. मात्र स्टेशनवर उतरून प्रवाशांना पुढील प्रवासासाठी बस अथवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. रो-रो सेवा सुरू झाल्यास प्रवाशांना हे अतिरिक्त कष्ट टाळता येतील.
मुंबई ते कोकण रस्ता अजूनही पूर्णपणे विकसित झालेला नाही. सणासुदीच्या काळात आणि विशेषतः पावसाळ्यात या मार्गावर वाहतूककोंडी सामान्य बाब बनली आहे. अशा वेळी ‘रो-रो’ सेवा केवळ प्रवाशांना दिलासा देणार नाही, तर रस्त्यावरील वाहनांच्या संख्येत घट होऊन अपघात आणि इंधन खर्चातही बचत होण्यास मदत होणार आहे. कोकण रेल्वेच्या या उपक्रमामुळे कोकणवासीयांचा सणासुदीचा प्रवास अधिक सुकर, सुरक्षित आणि सुसह्य होण्याची अपेक्षा आहे.
"सध्या ट्रकसारख्या जड वाहनांसाठी ‘रो-रो’ सेवा सुरू आहे. मात्र आगामी सणांच्या काळात कारसारख्या हलक्या वाहनांसाठीही ही सेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असून लवकरच त्याचा आराखडा पूर्ण करून सेवा सुरू केली जाईल." - संतोष कुमार झा, प्रबंध संचालक कोकण रेल्वे