रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील खेड येथील दिवाण खवटी, विन्हेरे या स्थानकादरम्यान रविवारी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास बोगद्याजवळ रेल्वे रुळावर दरड, माती आणि झाडे कोसळल्याने कोकण रेल्वे ठप्प झाली होती. ही ठप्प झालेली वाहतूक सोमवारी दुसऱ्या दिवशी तब्बल २४ तासांपेक्षा जास्त काळ बंद होती. कोकण रेल्वेच्या अथक प्रयत्नांनंतर सोमवारी सायंकाळी ५.३० वाजल्यानंतर रेल्वे मार्ग मोकळा करण्यात यश आले आहे.
यंत्रणेकडून सुरक्षेशी संबंधित चाचणी घेतल्यानंतर सुरक्षा सर्टिफिकेट मिळताच या रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवा पूर्ववत होईल, असे कोकण रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. सोमवारी या मार्गावरील काही गाड्या रद्द केल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले, तर काही गाड्या विलंबाने धावत आहेत. बोगद्याजवळ रुळावर माती आणि झाडे कोसळली होती, ती दूर करण्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे अडचण येत होती. मात्र, २४ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मार्ग मोकळा करण्यात आला असला तरीही आणखी काही तास गाड्या सुरू होण्यास वेळ लागणार असल्याचे रेल्वे अभियंत्यांकडून सांगण्यात आले.
प्रवाशांच्या मदतीला एसटी धावली
दरम्यान, कोकण रेल्वे मार्गावरील दिवाण खवटी येथे बोगद्याजवळ दरड कोसळल्याने खेड रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आलेल्या मांडवी एक्स्प्रेस आणि दिवा पॅसेंजर, तसेच रत्नागिरी रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आलेल्या तेजस आणि जनशताब्दी एक्स्प्रेस यातील प्रवाशांना मुंबईकडे रवाना करण्यासाठी एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली. त्यानुसार रत्नागिरी रेल्वे स्थानकातून ३२ एसटी बस, चिपळूण स्थानकातून १४, तर खेड रेल्वे स्थानकातून १२ बसेस पनवेलपर्यंत सोडण्यात आल्या.
पूरस्थिती निवळली
रविवारच्या जोरदार पावसानंतर कोकणातील पूरस्थिती सोमवारी निवळली. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूकही पूर्ववत झाली आहे. खेडमध्ये सकाळपर्यंत ५ फुटांपर्यंत दुकानांमध्ये व घरांमध्ये चढलेले पाणी दुपारपर्यंत ओसरले. त्यामुळे खेड नगरपालिकेने स्वच्छता मोहीम राबवली. चिपळूण, संगमेश्वर, देवरूखमधील पूरस्थिती पूर्णत: ओसरली आहे. त्यामुळे सर्वत्र जनजीवन सुरळीत झाले आहे.
रायगडला ‘रेड अलर्ट’; मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरीत ‘ऑरेंज अलर्ट’
गेल्या तीन-चार दिवसांपासून मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडसह कोकण पट्ट्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मुंबईत सोमवारी पावसाने काहीशी उघडीप घेतली असली तरी मंगळवारी मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरीत मुसळधार पाऊस बरसणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरीत 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे, तर रायगडमध्ये 'रेड अलर्ट' जारी करण्यात आल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.