परतीच्या चाकरमान्यांना वाहतूककोंडीचा फटका; वाहनांच्या लांबच लांब रांगा; एसटी बसचीही मोठी गर्दी

गौरी-गणपती विसर्जनानंतर तळ कोकणातून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या दिशेने परतणाऱ्या चाकरमान्यांच्या नशिबी वाहतूककोंडीची साडेसाती कायम राहिली. पाच दिवसांच्या, गौरीसोबतच्या तसेच सात दिवसांच्या गणरायाला निरोप देऊन रविवारीच मुंबईत परतून सोमवारी कामावर हजर राहण्याच्या तयारीत असलेल्या हजारो गणेशभक्तांना वाहतूककोंडीमुळे मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

रायगड : गौरी-गणपती विसर्जनानंतर तळ कोकणातून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या दिशेने परतणाऱ्या चाकरमान्यांच्या नशिबी वाहतूककोंडीची साडेसाती कायम राहिली. पाच दिवसांच्या, गौरीसोबतच्या तसेच सात दिवसांच्या गणरायाला निरोप देऊन रविवारीच मुंबईत परतून सोमवारी कामावर हजर राहण्याच्या तयारीत असलेल्या हजारो गणेशभक्तांना वाहतूककोंडीमुळे मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. नागोठणे-वडखळदरम्यान वाहतुकीचा वेग मंदावल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

रविवारी रात्रीपासूनच परतीच्या वाहनांची संख्या वाढली होती. सोमवारी कामावर पोहोचण्यासाठी अनेक नागरिक भल्या पहाटेच घराबाहेर पडले. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गासह रायगड जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर वाहनांची प्रचंड गर्दी झाली. अनेक प्रवाशांना सात ते साडेसात तासांहून अधिक काळ कोंडीत अडकून राहावे लागले. सध्याची परिस्थिती पाहता मुंबईतील घरी पोहोचण्यास रात्री उशीर होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी होती. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोफत सोडण्यात आलेल्या एसटी बसेसचा आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे मुंबई-कोकण मार्गावर एसटी बसेसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. परतीच्या प्रवासासाठी एसटीवर अवलंबून असलेल्या प्रवाशांची संख्या वाढल्याने अनेक बसेस गर्दीने फुलून गेल्या होत्या. गणेशोत्सवासाठी गावी जाताना आणि परतीच्या प्रवासातही मोठ्या प्रमाणात गर्दीचा सामना करावा लागल्याने प्रवास सुखकर होण्याऐवजी त्रासदायक ठरल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली. महामार्गावरील वाहतूककोंडीमुळे एसटी बसेसलाही वेळेत मार्गक्रमण करता येत नसल्याने प्रवाशांच्या अडचणीत आणखी भर पडली. दीर्घकाळ वाहतूककोंडीत अडकल्याने प्रवाशांचे हाल झाले. चहा, नाश्ता आणि भोजनासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने तसेच स्वच्छतागृहांची संख्या अपुरी असल्याने महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेष त्रास सहन करावा लागला.

अपुऱ्या सुविधेने प्रवाशांची अवस्था केविलवाणी

बाप्पाची मनोभावे सेवा करण्यासाठी गावी जाताना आणि परतताना भाविकांचे अतोनात हाल झाले. रविवारी लवकर मुंबईत पोहोचून सोमवारी कामावर हजर राहण्याची अपेक्षा होती; मात्र वाहतूककोंडीमुळे ती पूर्णपणे फोल ठरली. सध्याची परिस्थिती पाहता मुंबईला पोहोचण्यास रात्री उशीर होईल. चहा, नाश्ता, भोजन तसेच स्वच्छतागृहांच्या अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांची अवस्था केविलवाणी झाली आहे, अशी प्रतिक्रिया प्रवासी स्नेहा अनिल राणे आणि सारिका निलेश परब यांनी व्यक्त केली.

वाहतुकीवरील ताण वाढला

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव, इंदापूर परिसरात वाहतूककोंडीने गंभीर स्वरूप धारण केले. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या पाच ते सहा किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. इंदापूर परिसरातील रखडलेला बायपास, अपूर्ण कामे, अरुंद मार्ग, वाढलेली वाहनसंख्या यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. माणगाव परिसरातून मुंबई-गोवा महामार्गाला निजामपूर-पुणे, बामणोली, मोर्बा-दिवी पोर्ट तसेच कचेरी रोड हे प्रमुख जोडरस्ते जोडलेले आहेत. या मार्गांवरून मोठ्या संख्येने वाहने महामार्गावर येत असल्याने मुख्य मार्गावरील वाहतुकीचा ताण वाढला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in