कोकण ते पालघर जलमय; पावसाने जनजीवन विस्कळीत, प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कोकणसह पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काढले असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
कोकण ते पालघर जलमय; पावसाने जनजीवन विस्कळीत, प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत
कोकण ते पालघर जलमय; पावसाने जनजीवन विस्कळीत, प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कोकणसह पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काढले असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत, दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत, तर वीजपुरवठा खंडित होणे, दूषित पाणीपुरवठा, रस्ते व पूल पाण्याखाली जाणे आणि वाहतुकीवर निर्बंध यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांमध्ये शेकडो नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले असून बचाव, मदत आणि पुनर्वसनाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ, महावितरण आणि जिल्हा प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना करत आहेत.

अभूतपूर्व जलसंकट

पालघर : सलग कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने पालघर जिल्ह्यावर अभूतपूर्व जलसंकट ओढवले असून जिल्ह्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अतिवृष्टीमुळे आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला असून ४०१ कुटुंबांतील १,३०७ नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. अनेक गावे आणि पाड्यांचा संपर्क तुटला असून हजारो नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.डहाणू तालुक्यातील निकणे-पिंपळशेत आणि वधना-निकणे पुलांवरून पुराचे पाणी वेगाने वाहू लागल्याने सहा गावे आणि १२ पाड्यांचा बाह्य जगाशी संपर्क तुटला.

जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, पालघर, वसई आणि वाडा तालुक्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. सध्या ३८९ कुटुंबांतील १,२६१ नागरिक विविध निवारा केंद्रांमध्ये राहत असून त्यांना अन्न, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि इतर मूलभूत सुविधा पुरविण्यात पुराच्या तडाख्यात दोन पक्की घरे पूर्णपणे उद्ध्वस्त, ७३ पक्क्या घरांचे अंशतः नुकसान, चार कच्ची घरे कोसळली, तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पशुधनालाही मोठा फटका बसला असून सात म्हशी, दोन बैल, दोन वराह आणि तब्बल ८,०८५ कुक्कुट पक्षी मृत्युमुखी पडले आहेत.

दहिवलीत दरड कोसळून दोघांचा मृत्यू

रत्नागिरी : खेड तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडीमध्ये झालेल्या भीषण भूस्खलन दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या दोन्ही व्यक्तींचे मृतदेह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी मंगळवारी शोधून काढले. सतीश शांताराम शेलार (३०) आणि शांताराम बलराम शेलार (८४) अशी मृतांची नावे असून, आवश्यक प्रशासकीय व वैद्यकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर त्यांचे मृतदेह सायंकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दहिवली येथील शेलारवाडीत सोमवारी रात्री अचानक झालेल्या भूस्खलनामुळे शेलार कुटुंबीयांचे घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले. या मोहिमेत कल्पना शांताराम शेलार (७३) यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली. जवानांनी अथक प्रयत्न सुरू ठेवत अखेर दोन्ही बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. मृतदेह बाहेर काढल्यानंतर आवश्यक पंचनामा, वैद्यकीय तपासणी आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. त्यानंतर मृतदेह शोकाकुल नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.

मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाखांची मदत

या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना शासनाकडून तातडीने प्रत्येकी चार लाखांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश देण्यात आले असून, कशेडी येथील भूस्खलनामुळे बाधित झालेल्या दोन कुटुंबांनाही तातडीची मदत देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यंदा वाशिष्ठी आणि जगबुडी नद्यांमधील गाळ उपशाची कामे वेळेत झाल्यामुळे चिपळूण शहरातील पूरस्थिती नियंत्रणात राहिल्याचे पालकमंत्री सामंत यांनी नमूद केले. सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

६७ गावांचा वीजपुरवठा बाधित

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. वीजवाहिन्या तुटणे, खांब कोसळणे आणि तांत्रिक बिघाडांमुळे जिल्ह्यातील ६७ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. ११ केव्हीचे १७ आणि ३३ केव्हीचे २ उच्चदाब फीडर बाधित झाले असून ७३ उच्चदाब व १४३ लघुदाब वीज खांबांचे नुकसान झाले आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी महावितरणने २९ एम्पॅनेल्ड आणि १३ बेरोजगार अभियंता एजन्सींसह एकूण ४२ पथके कार्यरत केली आहेत. मुसळधार पाऊस, चिखल, दरडीचा धोका आणि दुर्गम भागातील अडचणींवर मात करत कर्मचारी युद्धपातळीवर दुरुस्ती करत आहेत.

५० गावपाड्यांचा संपर्क तुटला

जव्हार : मुसळधार पावसामुळे काळशेती नदीला पूर आल्याने दहा ग्रामपंचायतींतील सुमारे ५० गावपाड्यांचा संपर्क तुटला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावर प्राथमिक आरोग्य केंद्र, पाच आरोग्य उपकेंद्रे आणि आश्रमशाळा असल्याने आरोग्यसेवा, शिक्षण आणि दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाला आहे. गेली सहा वर्षे पुलाची उंची वाढविण्याची मागणी होत असली तरी अद्याप काम सुरू झालेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पुलासाठी पाच कोटींचा निधीची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले असले तरी प्रत्यक्ष काम सुरू न झाल्याने यंदाही नागरिकांना संपर्क तुटण्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

दूषित पाणीपुरवठ्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर

पेण : शहरात गेल्या काही दिवसांपासून गाळयुक्त, पिवळसर आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सलग झालेल्या मुसळधार पावसानंतर ही समस्या वाढली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. तसेच जिते गावातील १६ आणि हॉटेल हिमगौरीमधील ३० अशा एकूण ४६ नागरिकांना महापुराच्या विळख्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. शहराला दररोज १८ एमएलडी पाण्याची गरज असताना नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता केवळ ५ एमएलडी असल्याने पाण्यावर पुरेशी प्रक्रिया होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शासनाने मात्र पाणीवाहिन्यांमध्ये गाळ साचल्यामुळे तात्पुरती समस्या निर्माण झाल्याचे सांगत स्वच्छता आणि दुरुस्तीची कामे सुरू असल्याचा दावा केला आहे.

प्रशासनाकडून पाहणी

अलिबाग : रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे आणि पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी पेण तालुक्यातील कणे येथील पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. पूरग्रस्त ग्रामस्थांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाहीही प्रशासनाने दिली. जिल्हा प्रशासनाकडून पूरस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक ते बचाव व मदतकार्य प्राधान्याने सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

कोकण ते पालघर जलमय; पावसाने जनजीवन विस्कळीत, प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत
पावसाच्या तडाख्याने जनजीवन ठप्प; गावे जलमय, रस्ते बंद, पर्यटनस्थळांवर बंदी

२० टनांवरील अवजड वाहनांना बंदी

रायगड : अलिबाग तालुक्यातील रेवदंडा-साळाव पुलाच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने २० टनांपेक्षा जास्त वजनाच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर पुढील आदेशापर्यंत बंदी घातली आहे. पुलाची दुरुस्ती अंतिम टप्प्यात असून सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. वाहनांसाठी ताशी ३० किलोमीटर वेगमर्यादा निश्चित करण्यात आली असून दोन वाहनांमध्ये किमान २० मीटर अंतर राखणे बंधनकारक केले आहे. अवजड वाहनांसाठी अलिबाग, पोयनाड, नागोठणे, रोहा, कोलाड तसेच बेलकडेमार्गे पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. दूध, एलपीजी, औषधे, ऑक्सिजन, पेट्रोल, डिझेल, भाजीपाला आणि पाणी वाहतूक करणाऱ्या जीवनावश्यक सेवांच्या वाहनांना या बंदीतून सूट देण्यात आली आहे.

भिवंडीत दूषित पाण्यासह वीजपुरवठा खंडित

भिवंडी : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भिवंडी शहरात गेल्या काही महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, तर दुसऱ्या बाजूला सलग दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वऱ्हाळदेवी नगर परिसरात मे महिन्यापासून नळांद्वारे अस्वच्छ आणि दूषित पाणी येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. स्थानिक नागरिक ॲड. मुकेश नवगिरे यांनी दूषित पाण्यामुळे भविष्यात गंभीर आरोग्यविषयक संकट निर्माण होऊ शकते, असा इशारा देत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. टोरंट पॉवरचे जनसंपर्क अधिकारी चेतन बदियानी यांनी दिलेल्या माहितीनुसार इंडियन कॉर्पोरेशन, अरिहंत कम्पाऊंड, सुभाष नगर, खोणी, मानकोली आणि चाविंद्रा परिसरातील वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in