मुंबई : महाराजांनी उभारलेला सिंधुदुर्ग किल्ला अनेक वर्षांनंतरही उभा आहे, पण यांनी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एका वर्षात कोसळला. कोकणात जे वाईट सुरू आहे, ते पाहवत नाही. मात्र, आम्ही कोकणचे अदानीकरण होऊ देणार नाही, असा सज्जड इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजप व मोदींना दिला.
भाजपचे लोक काही दिवसांपूर्वी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग सीमेवर अदानींच्या गोल्फ कोर्ससाठी जागा शोधत होते, अशी माझ्याकडे माहिती आहे. हे लोक अदानीचे दलाल बनून माझ्या कोकणात येतात, कोकणवासीयांना फसवतात. कोकणवासीयांच्या जागा ओरबाडून अदानीच्या चरणी वाहत आहेत. आपल्या हक्काची मुंबई अदानींच्या घशात घातली. आमचे सरकार आल्यानंतर अदानींच्या घशात घातलेली मुंबई परत काढून घेणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले. माझ्या कोकणाचे अदानीकरण मी कदापि होऊ देणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडल्याचा ठपका ठेवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. आपले इथले आमदार ‘खाली मुंडी पाताळ धुंडी’ आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर ते म्हणतात की, वाईटातून काहीतरी चांगले होते. महाराजांचा पुतळा पडला त्यातून चांगले काय होणार आहे. तुमच्या डोक्यामध्ये मेंदू आहे की कचरा? त्यातून काही चांगले होणार नाही, पण दीपक केसरकर पडल्यानंतर सिंधुदुर्गाचे चांगले होणार आहे, अशा शब्दांत त्यांनी केसरकर यांचा समाचार घेतला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुडाळ आणि कणकवलीमध्ये सभा घेऊन विद्यमान आमदार दीपक केसरकर तसेच राणे पिता-पुत्रांवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका केली. सिंधुदुर्गात होत असलेली गुंडगिरी काही वर्षांपूर्वी तुम्हीच संपविली होती आणि आता चुकून खासदार म्हणून निवडून दिला आहे. आता पुन्हा बाप आणि मुलांची दादागिरी सुरू होणार. आताच चूक सुधारली नाही तर बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल. मोदी घराणेशाहीवर बोलतात. यांना उद्धव ठाकरे नको, पण बाप डोक्यावर आणि त्याची दोन मुले खांद्यावर घेऊन ते मिरवत आहेत, अशी तिखट टीका त्यांनी केली.
शेतकऱ्यांची कर्जमाफी करून दाखवणार
राज्यातील सर्व जनता आणि शेतकरी कमालीचा त्रस्त आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांना पान्हा फुटला आहे. लोकसभेत फटके पडल्यानंतर यांना माता-भगिनी, शेतकऱ्यांची आठवण आली. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवू म्हणताहेत. पण आम्ही कर्जमुक्त करून दाखवले आहे. अडीच वर्षांपूर्वी सरकार पाडले नसते, तर परत करून दाखवले असते. आमचे सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा कर्जमाफी करून दाखवणार, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.