कोपर्डी प्रकरणातील आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या; पप्पू शिंदेने येरवडा जेलमध्ये संपवले जीवन

पहाटेच्या सुमारास पोलीस गस्तीसाठी गेले असताना हा आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला
कोपर्डी प्रकरणातील आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या; पप्पू शिंदेने येरवडा जेलमध्ये संपवले जीवन

पुणे : संपूर्ण महाराष्ट्राला हादरविणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी पप्पू शिंदे याने रविवारी पुण्यातील येरवडा कारागृहात आपले जीवन संपवले. रविवारी पहाटे गळफास घेऊन त्याने आपल्या आयुष्याला पूर्णविराम दिला. सुमारे पाच वर्षांपासून तो येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत होता. पहाटेच्या सुमारास पोलीस गस्तीसाठी गेले असताना हा आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला.

कोपर्डीतील शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी त्याच्यासह तीन आरोपींना अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी २०१७ मध्ये दोषी ठरवले होते. दरम्यान, एवढ्या मोठ्या हत्याकांडातील मुख्य आरोपी गळफास घेऊन आत्महत्या करतो, तेव्हा जेल प्रशासन काय करत होते? असा सवाल आता उपस्थित होतोय. आरोपीचा मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आला असून तिथे त्याचे शवविच्छेदन करण्यात येईल. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

येरवडा जेलमधील सुरक्षा क्रमांक-१च्या खोली क्रमांक १४ मध्ये पप्पूने टॉवेल फाडून कापडी पट्टीच्या सहाय्याने खोलीच्या दरवाजावरील पट्टीला बांधून सकाळी सहाच्या सुमारास आत्महत्या केली. ही बाब कामावर असणारे करागृह कर्मचारी निलेश कांबळे यांच्या लक्षात आली, त्यांनी तातडीने इतर सहकाऱ्यांना बोलावून घेत पप्पूला खाली उतरवले. परंतु तोपर्यंत त्याचा जीव गेला होता. मानसिक आजारी असलेल्या पप्पूवर मनोरुग्ण तज्ज्ञांच्या सल्ल्याने नियमित औषधोपचार सुरू होते. गळफास घेतल्याची माहिती तुरुंग प्रशासनाला कळताच, काही वेळातच पोलिसांनी तिथे जाऊन पाहणी केली. तुरुंग अधिकारी अमिताभ गुप्ताही थोड्या वेळातच येरवडा कारागृहात पोहोचले.

१३ जुलै २०१६ रोजी कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणातल्या तिन्ही आरोपींना २९ नोव्हेंबर २०१७ रोजी अहमदनगरच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर आरोपी संतोष भवाळ याने या शिक्षेला मुंबईत हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले तसेच मुंबई हायकोर्टातही स्वतंत्र याचिका दाखल केली. सध्या या खटल्याची सुनावणी प्रलंबित असल्यामुळेच तिन्ही आरोपींनी येरवडा कारागृहात ठेवण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in