
हारून शेख/लासलगाव
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर व मेथीच्या जुडीला अवघा एक रुपया भाव पुकारण्यात आला. हा भाव ऐकून पार निराश झालेल्या शेतकऱ्याने विक्रीस आणलेल्या पाच हजार जुड्या निफाड तालुक्यातील चांदोरी परिसरातील रस्त्याच्या कडेला फेकून देऊन आपला संताप व्यक्त केला.
नाशिकच्या चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील शेतकरी कैलाश नामदेव जिरे यांनी आपल्या घरापासून अवघ्या १५ किलो मीटर अंतरावर असलेल्या लासलगाव बाजार समितीकडे न जाता शेतमालाला चार पैसे अधिक मिळतील या आशेने ७५ किमी अंतरावर असलेले उपआवार खानगाव गाठले. त्यांनी टेम्पोमधून तब्बल तीन हजार जुडी कोथिंबीर व दोन हजार जुडी मेथी विक्रीस नेली होती. मात्र, बाजार समितीत लिलावात भाजीला अवघा एक रुपया प्रति जुडी भाव पुकारण्यात आला. या विक्रीतून उत्पादन खर्च सोडाच, काढणीचा खर्च व किमान गाडीभाड्याचा खर्चसुद्धा निघणार नाही याची जाणीव होताच सदर शेतकरी हतबल झाले. त्यांनी आपला शेतमाल व्यापारी व ग्राहकांना मोफत देण्यापेक्षा रस्त्यावरल्या जनावरांना टाकणे पसंत केले. त्यांनी नाशिक -संभाजीनगर मार्गावर चांदोरी परिसरात जागोजागी भाजी फेकून देत सरकारचा आगळा निषेध केला.
सततचा पाऊस हा भाजीपाला पिकासाठी प्रतिकूल असला तरीही अनेक शेतकऱ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन भाजीपाला पिकवला आहे.
दोन आठवड्यापूर्वी मेथीचा दर किरकोळ बाजारात ४० ते ५० रुपये जुडी, तर कोथिंबीर २० ते २५ रूपये जुडी होती. तथापि, आज बाजारात त्याच जुडीला अवघा एक ते तीन रुपया जुडी असा दर मिळत होता. हे प्रकरण सरकारने गांभीर्याने घ्यावे व शेतमालाला हमीभाव द्यावा अशी मागणी आता शेतकरी करू लागले आहेत.
आता करायचे काय?
जीवाचे रान करून भाजी पिकवतो, पण मार्केटमध्ये भाव मिळत नाही. इतक्या कमी भावाने विकायचे तर काहीही हातात राहत नाही. आज गाडीभाडेदेखील खिशातून भरावे लागले आहे. त्यामुळे आता करायचे काय? आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नाही.
कैलास जिरे, शेतकरी, तळेगाव रोही