
कराड : साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील कोयना धरणाच्या जलाशयाचे 'शिवसागर' जलाशयाऐवजी 'छत्रपती शिवाजी महाराज' जलाशय असे अधिकृत नामकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याने या नामकरणामुळे देशातच नाही तर संपूर्ण जगात कोयना धरणाची भव्यता वाढणार आहे. छत्रपतींचे हे स्मारक चिरंकालीन राहील,याचा फायदा व लाभ कोयनानगरसह परिसराला चांगल्या पद्धतीने होईल, असा विश्वास कोयनावासीयांना वाटत आहे.
पाटण तालुक्यातील तमाम जनतेसह महाराष्ट्रातील जनतेची मागणी होती,कोयना धरणाच्या जलाशयाचे शिवसागर या एकेरी नावाचे 'छत्रपती शिवाजी महाराज जलाशय' असे नामकरण करावे. या जनतेच्या या मागणीचा गांभीर्याने विचार करून शासनाने वरीलप्रमाणे नामकरण करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली असून शासनाने खूप उशिरा का होईना पण घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. या नामकरणासाठी जिल्ह्यातील जनतेकडून त्यातही पाटण तालुक्यातील जनतेतून वारंवार मागणी होत होती. अखेर या मागणीची दखल घेऊन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रालयात बैठक घेऊन या बैठकीत त्यांनी तातडीने या संदर्भात सचिवांना आदेश देत शासन निर्णय जारी करण्याचे निर्देश दिले. कायदेशीर पद्धतीने या नामकरणाला भविष्यात कोणतीही चूक राहता कामा नये. या सर्व बाबींचा अभ्यास करून कोयना धरणाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज जलाशय’ असे नामकरण होणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी या बैठकीत स्पष्ट केले. कोयनेला पर्यटनाच्या माध्यमातून मूळपदावर आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची मागणी कोयनावासीयांनी केली आहे.
कोयना धरणाच्या जलाशयात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य अश्वारूढ पुतळा उभा करण्याच्या बाबतीत देखील सकारात्मक चर्चा झाली असून तशा पद्धतीचा आराखडा आठ दिवसांत तयार करण्याच्या सूचनाही मुख्य सचिवांना दिल्या आहेत. तसेच कोयनानगरच्या पर्यटन संदर्भात ज्या काही गोष्टी करता येतील त्या संदर्भात देखील आराखडा तयार करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
- राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री