
कराड : पाटणसह कोयना धरणांतर्गत विभागात पुन्हा एकदा जोरदार पावसाने सुरुवात केल्यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. १०५.२५ टीएमसी क्षमता असलेल्या या धरणाची पाणी साठवण क्षमता जवळपास संपुष्टात आल्याने, धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात कोयना नदीपात्रात विसर्ग वाढवण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला आहे.
शुक्रवारी संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने धरण व्यवस्थापनाने विसर्ग वाढवला आहे.
सध्याची विसर्गाची स्थिती खालीलप्रमाणे आहे :
वक्र दरवाजे (सहाही) दोन फुटांनी वर उचलून १८,७३४ क्युसेक्स विसर्ग करण्यात आला. तर वीजनिर्मिती करून २,१०० क्युसेक्स विसर्ग करण्यात आला. एकूण २०,८३४ क्युसेक्स पाणी पूर्वेकडील कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
या मोठ्या विसर्गामुळे आणि पूर्वेकडील विभागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत धोकादायक वाढ झाली आहे. प्रशासनाने गावे आणि नदीकाठची लोकवस्त्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पाण्याची आवक कमी-जास्त होईल, त्याच प्रमाणात विसर्ग सुरू राहील, अशी माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे.
धरणातील पाण्याची स्थिती
एकूण पाणीसाठा - १०४.९२ टीएमसी (धरण क्षमता १०५.२५ टीएमसी)
शिल्लक क्षमता - ०.३३ टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा - ९९.९२ टीएमसी
जलपातळी (मीटर) - ६५९.३५९ मीटर
जलपातळी (फूट) - २१६३.३ फूट