
कराड: पाटण तालुक्यातील कोयना विभागात १९६७ साली ६.६ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला होता. त्यानंतर आजपर्यंत या विभागात एवढ्या मोठ्या तीव्रतेचा भूकंप झाला नसला तरी कोयनानगर, ता पाटण येथील 'किर्णास' भूकंपमापन वेधशाळेत आजअखेर एकूण सव्वा लाख धक्के नोंदवले आहेत.
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाची निर्मिती कोयनानगर येथे झाल्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने कोयनानगर येथे भूकंपमापन वेधशाळा उभारण्यात आली.
राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या या वेधशाळेत प्रादेशिक भूकंपांची नोंद घेतली जाते. वास्तविक येथे प्रादेशिकसह देशभरातील सर्वच भूकंपमापक केंद्रांना भूकंप समजतात. मात्र, नोंद फक्त प्रादेशिक विभागातीलच घेतली जाते. वेधशाळेतील नोंदीनुसार गत ६१ वर्षात सव्वा लाखावर भूकंपांची नोंद झाली आहे.
या भूकंपांचा केंद्रबिंदू कोयना तसेच वारणा खोऱ्यामध्ये आहे. मात्र, कोयना खोऱ्यात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपांपेक्षा वारणा खोऱ्यात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे. येथे झालेल्या भूकंपाची तीव्रता देखील जास्त असल्याचे दिसून आले आहेत.
१९६३ ते मे २०२५ अखेरचे धक्के
३ रिश्टर स्केलपेक्षा कमी (अतिसौम्य) - १,१९,९२४
३ ते ४ रिश्टर स्केल (सौम्य) - १,६७२
४ ते ५ रिश्टर स्केल (मध्यम) - ९६
५ रिश्टर स्केलपेक्षा जास्त (तीव्र) - ९
आजपर्यंत नोंदवलेले भूकंप - १,२१,७०४
कोयनेला १९६७ साली विनाशकारी भूकंप झाला. त्यावेळी रशिया बनावटीचे 'किर्णास' हे त्याकाळचे अत्याधुनिक यंत्र कोयना वेधशाळेला देण्यात आले होते. त्या यंत्रावरूनच पुढे या वेधशाळेला 'किर्णास' हे नाव पडले. - डी. एम. चौधरी, सहाय्यक संशोधन सेवानिवृत्त
हेळवाकपासून दक्षिणेला वारणा खोरे
कोयना नदी पाटण तालुक्यातील हेळवाकपर्यंत येऊन तेथून ९० अंशांमध्ये पाटण,कराडकडे वळते. तेथून दक्षिणेकडील भाग हा वारणा खोरे म्हणून ओळखला जातो, तर उत्तरेकडे कोयना खोरे सुरू होते. मळे, कोळणे, पाथरपुंज, नाव, मोरगिरी खोरे, चांदोली, सिद्धेश्वर, चांदेल, पांढरपाणी यासह चांदोलीचा भाग वारणा खोऱ्यात येतो तर कोयना खोऱ्याने सातारा जिल्ह्यातील बहुतांश भाग व्यापला आहे. तसेच वारणा खोऱ्यात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपांची तीव्रताही जास्त असल्याचे त्या-त्या वेळच्या नोंदीवरून दिसून येते.