पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती; कृष्णामाई दुथडी भरून वाहू लागली, तर वारणा नदीपात्राबाहेर

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून सांगली जिल्हामधील शिराळा, वाळवा, पलूस तालुका तसेच कृष्णाकाठ परिसरात पावसाचा जोर सुरूच आहे. गेले दोन दिवस वेगवेगळ्या धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे दुथडी भरून वाहत असलेली कृष्णा नदी पात्राबाहेर पडून वाहू लागली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती; कृष्णामाई दुथडी भरून वाहू लागली, तर वारणा नदीपात्राबाहेर
Published on

कराड : सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून सांगली जिल्हामधील शिराळा, वाळवा, पलूस तालुका तसेच कृष्णाकाठ परिसरात पावसाचा जोर सुरूच आहे. गेले दोन दिवस वेगवेगळ्या धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे दुथडी भरून वाहत असलेली कृष्णा नदी पात्राबाहेर पडून वाहू लागली आहे. रविवारी संध्याकाळपासून आज दिवसभरात कृष्णेच्या पाणीपातळीत सुमारे साडे चार फुटांची वाढ झाली आहे. सकाळपासून पाणीपातळी झपाट्याने वाढल्याने पलूस तालुक्यातील नागठाणे बंधारा दुपारी पाण्याखाली गेला आहे.

कोयनेसह सर्वच धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पडणारा पाऊस आणि धरणातून केला जाणारा विसर्ग यामुळे कराड व पाटण तालुक्यातील कृष्णा व कोयना नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने वसंत जलसागराचे पाणी वारणा नदीपात्रात येत असल्याने वारणा नदीही पात्रा बाहेर पडली आहे. त्यातच सांगलीजवळ वारणा नदी कृष्णामाईला येऊन मिळत असल्याने सांगलीतील ब्रिटिशकालीन आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पाणीपातळी तब्बल २७ फुटावर जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आव्हान केले आहे.

कोयनेतून ३१ हजार ७४६ क्युसेसने पाण्याचा विसर्ग कृष्णा नदी पात्रात सोडण्यात आला आहे. तोही कराडजवळ कृष्णेला येऊन मिळत असल्याने तर सांगलीच्या वारणा धरणातून १४ हजार ८८० क्युसेस विसर्ग वारणा पात्रात सोडण्यात येत असल्याने सांगलीपासून पुढे कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या दोन्ही काठांवरील गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वारणा आणि कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे दोन्ही नदी काठांच्या आसपासच्या शेतामध्ये पाणी गेले आहे.

पिकाचे ही नुकसान होत आहे. असाच जर विसर्ग राहिला तर आणखी पाणी पातळी वाढणार आहे.त्यामुळे पाणी पातळी वाढत असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

या संततधार पावसामुळे तापमानाचा पारा खाली आला असून वातावरणातील गारठा प्रचंड वाढला आहे. कृष्णा, कोयना व वारणा नद्यांचे पाणी नदी पात्राबाहेर पडल्याने सर्वांच्या नजरा कोयना धरणातून सुरू असलेल्या पाणी विसर्ग वाढतो की कमी होतो याकडे लागल्या आहेत. गेले दोन दिवस कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार बँटींग केली. त्यामुळे विसर्ग वाढवण्यात येत आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.मात्र सोमवारी पावसाने उसंत घेतल्याने कोयनेतील विसर्ग सध्या तरी वाढण्याची शक्यता नाही.मात्र तो कमी करण्यात येणार आहे का? याकडे सांगली,कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या नजरा लागल्या आहेत.

नदीकाठच्या पोटमळ्यांमध्ये पाणी

पलूस तालुक्यातील बुर्ली, आमणापूर, धनगाव गावांच्या परिसरातील नदीकाठच्या पोटमळ्यांमध्ये पाणी शिरू लागले आहे. त्यामुळे मळीतील गवत कापणीसाठी शेतकऱ्यांची धांदल उडत आहे. तर हौशी तरूणाईची अनेक ओढ्यामध्ये मासे पकडण्याची खटापट सुरू आहे.

नागठाणे बंधाराही वाहतुकीसाठी बंद

दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित तालुक्यातील महसूल विभाग, पोलीस ठाण्याचे पोलीस आणि ग्राम सुरक्षा यंत्रणेचे सरपंच, पोलीस पाटील यांनी धोकादायक बंधाऱ्यांवरील वाहतूक बंद केली आहे. यामुळे नागठाणे बंधाराही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याने नागठाणे गावाचा शिरगावशी संपर्क तुटला आहे.

logo
marathi.freepressjournal.in