कुडाळ-सावंतवाडीमध्ये पावसाच्या सरी; आंबा-काजू पिकांवर परिणाम होण्याची शक्यता…!

जिल्ह्यातील सावंतवाडी आणि कुडाळ तालुक्याच्या बहुतेक भागात अचानक पावसाच्या सरी कोसळल्या. अनपेक्षित आलेल्या या पावसामुळे शेतकरी आणि बागायतदारांची एकच तारांबळ उडाली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. उष्म्यात झालेल्या वाढीमुळे पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली जात होती.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील सावंतवाडी आणि कुडाळ तालुक्याच्या बहुतेक भागात अचानक पावसाच्या सरी कोसळल्या. अनपेक्षित आलेल्या या पावसामुळे शेतकरी आणि बागायतदारांची एकच तारांबळ उडाली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. उष्म्यात झालेल्या वाढीमुळे पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली जात होती. जिल्ह्यातील इतर भागातदेखील दिवसभर काळे ढग दाटून आल्याने केव्हाही पाऊस कोसळेल या शक्यतेमुळे शेतकरी आणि बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

गेल्या आठवडाभरापासून पडणाऱ्या थंडीमुळे आंबा आणि काजू बागायतदार सुखावले होते. फळधारणा आणि फुलोरा प्रक्रियेसाठी अनुकूल वातावरण मिळत असल्याने चांगली अपेक्षा होती. मात्र रविवारपासून वातावरणात अचानक बदल होऊ लागला. दुपारी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडाली. सध्या अनेक शेतकरी भात कापणीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. तर बागायतदारांनी आंबा-काजू बागांची सफाई आणि देखभाल सुरू केली आहे. अशातच आलेल्या पावसामुळे आणि निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे या फळपिकांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशेषतः या दिवसांत आंबा-काजू झाडांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती बागायतदारांना सतावत आहे.

एकूणच, यंदाच्या हंगामात आंबा आणि काजू पिकांबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून आगामी हवामानावरच उत्पादनाची स्थिती अवलंबून राहणार असल्याचे शेतकरी-बागायतदारांचे म्हणणे आहे.

बागायतदारांच्या खर्चात भर

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या थंडीमुळे काजूच्या कलमांना चांगली पालवी फुटली होती. आंब्याच्या झाडांवर मोहोर फुटण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र आता सतत ढगाळ वातावरण राहिल्यास किंवा पुढील काही दिवसांत पाऊस सुरू राहिल्यास कीड-रोगांवर नियंत्रणासाठी फवारणी करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे बागायतदारांच्या खर्चात भर पडण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in