

कुडाळ : कुडाळ शहरातील पानबाजार परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत मंगळवारी दुपारी भरदिवसा दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. महिला कॅशियरला चाकूचा धाक दाखवून लाखो रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या भक्तराज वासुदेव सडवेलकर ( २८) याला बँक कर्मचारी आणि नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
मंगळवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास चेहऱ्यावर मास्क लावून बँकेत शिरलेल्या संशयिताने महिला कॅशियरला चाकूचा धाक दाखवत रोकड ताब्यात घेतली. मात्र, तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना कर्मचारी आणि नागरिकांनी प्रसंगावधान राखत त्याला पकडले.
या झटापटीत एका नागरिकाला चाकू लागल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. संशयिताकडून चोरलेली रोकड जप्त करण्यात आली असून, प्राथमिक माहितीनुसार ही रक्कम ३३ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. जखमी संशयिताला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या दरोड्याच्या प्रयत्नात अन्य कोणी सहभागी होते का, बँकेची पूर्वनियोजित रेकी करण्यात आली होती का, याचा तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, बँकेत सध्या सुरक्षा रक्षक नसल्याने सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.