'कुमार महाराष्ट्र केसरी' सूरज निकमने केली आत्महत्या; कुस्ती क्षेत्रामध्ये हळहळ

कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट करणाऱ्या सूरजने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या आधी सूरजच्या वडिलांचे निधन झालं होतं आणि त्यामुळे तो व्यथित झाला होता.
'कुमार महाराष्ट्र केसरी' सूरज निकमने केली आत्महत्या; कुस्ती क्षेत्रामध्ये हळहळ

सांगली : सांगलीतील युवा पैलवान सूरज निकमने शुक्रवारी संध्याकाळी त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सूरज हा ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ पैलवान होता. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस याबाबत तपास करत आहेत. कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट करणाऱ्या सूरजच्या आत्महत्येमुळे सांगलीतील कुस्ती क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

पैलवान सूरज हा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नागेवाडी या गावचा रहिवासी आहे. त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याने यापूर्वी कुस्ती क्षेत्रातील अनेक किताब पटाकविले आहेत. विरोधी पैलवानाला कोणत्या डावावर चितपट करायचे यात त्याचा हातखंडा होता. त्याने अल्पावधीतच आपला कुस्ती क्षेत्रात दबदबा निर्माण करत कुमार केसरी होण्याचा बहुमान मिळवलेला आहे.

कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट करणाऱ्या सूरजने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या आधी सूरजच्या वडिलांचे निधन झालं होतं आणि त्यामुळे तो व्यथित झाला होता. सूरजच्या निधनाचे वृत्त समजताच कुस्ती क्षेत्रासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. निधनानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. शनिवारी दुपारी त्याचे बंधू आल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे समजते.

logo
marathi.freepressjournal.in