नाशिक-त्र्यंबकेश्वर धार्मिक सोहळ्याला गती मिळणार; कुंभमेळा प्राधिकरण विधेयक सादर

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा ३१ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार असून या धार्मिक सोहळ्याच्या आयोजनासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष प्राधिकरण स्थापन करण्यासाठीचे विधेयक सोमवारी विधानसभेत सादर केले.
नाशिक-त्र्यंबकेश्वर धार्मिक सोहळ्याला गती मिळणार; कुंभमेळा प्राधिकरण विधेयक सादर
Published on

मुंबई : नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा ३१ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार असून या धार्मिक सोहळ्याच्या आयोजनासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष प्राधिकरण स्थापन करण्यासाठीचे विधेयक सोमवारी विधानसभेत सादर केले.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हे विधेयक सादर करण्यात आले. नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि आसपासच्या परिसरात कुंभमेळा व संबंधित उपक्रमांचे नियोजन व व्यवस्थापन करण्यासाठी प्राधिकरण स्थापन करण्याची तरतूद या विधेयकात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर ४ जून २०२४ रोजी या प्राधिकरणासाठी अध्यादेश काढण्यात आला होता. या विधेयकानुसार, २२ सदस्यीय प्राधिकरण असणार असून त्याचे अध्यक्ष नाशिक विभागीय आयुक्त असतील. नाशिक जिल्हाधिकारी व नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक हे उपाध्यक्ष असतील.

अध्यक्षाला शासन विभाग व इतर संस्थांकडून आवश्यक सेवा, सुविधा, जागा, वाहने इत्यादी कुंभमेळ्यासाठी मागवण्याचे अधिकार असतील. एक मंत्री समितीही स्थापन करण्यात येईल. ती वेळोवेळी प्राधिकरणाच्या कामाचा आढावा घेईल.

सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरुवात ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी त्र्यंबकेश्वर व नाशिकमधील रामकुंड येथे ‘ध्वजारोहण’ सोहळ्याने होईल. तर २४ जुलै २०२८ रोजी ध्वज उतरवून या १२ वर्षांनी येणाऱ्या महोत्सवाचा समारोप होईल. कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

सूतगिरणी व रस्ते विकासाला चालना

महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांनी सोमवारी सांगितले की, अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव असलेल्या चोंडी (जि. अहिल्यानगर) येथील विकासासाठी राज्य सरकारच्या पुरवणी मागण्यांमध्ये महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात छोंडी येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांनुसार ही तरतूद करण्यात आली आहे. या बैठकीचे औचित्य इंदूरच्या अठराव्या शतकातील शासिका अहिल्याबाई होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त साधण्यात आले होते. शिंदे यांनी सांगितले की, मंत्रिमंडळाने ₹६८१ कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in