कुंभमेळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्र बॅण्डिंगची संधी; विकासकामांना गती देण्याचे मुख्य सचिवांचे निर्देश

२०२७ मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्राचे ग्लोबल ब्रेण्डिंग करण्याची मोठी संधी आहे. या निमित्ताने धार्मिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळून रोजगारनिर्मिती वाढण्यास मदत होणार आहे.
कुंभमेळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्र बॅण्डिंगची संधी; विकासकामांना गती देण्याचे मुख्य सचिवांचे निर्देश
कुंभमेळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्र बॅण्डिंगची संधी; विकासकामांना गती देण्याचे मुख्य सचिवांचे निर्देश
Published on

नाशिक : २०२७ मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्राचे ग्लोबल ब्रेण्डिंग करण्याची मोठी संधी आहे. या निमित्ताने धार्मिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळून रोजगारनिर्मिती वाढण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जागतिक स्तरावर प्रदर्शित करण्यासाठी प्रत्येक विभागाने सूक्ष्म नियोजन करून काम करावे, तसेच कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या विकासकामांना गती द्यावी, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस नगरविकासाचे अपर मुख्य सचिव गोविंदराज, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अनुपकुमार, विभागीय आयुक्त व कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम, विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल, ठाणे विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, एनएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पंचायत समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आदी उपस्थित होते.

राजेशकुमार म्हणाले की, प्रयागराज कुंभमेळ्याचा अनुभव पाहता नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. यासाठी गर्दी व्यवस्थापनाचे टप्याटप्प्याने नियोजन करणे आवश्यक आहे. भाविकांना उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांची माहिती अॅप, पोर्टल आणि डिजिटल माध्यमांतून कुंभमेळ्यापूर्वीच उपलब्ध करावी. पार्किंगपासून ते अमृत स्नान स्थळापर्यंत भाविकांच्या सुरक्षित मार्गक्रमणासाठी एकात्मिक यंत्रणांची समन्वयपूर्ण कामगिरी ही महत्त्वाची आहे, असे त्यांनी नमूद केले. कुंभमेळ्यात महाराष्ट्राच्या कला आणि संस्कृतीला जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी पर्यटन विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या समन्वयाने कार्यक्रम आखावेत, अशी सूचना देण्यात आली. मागील सिंहस्थ कुंभमेळ्यात काम केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा अनुभव यावेळी उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी सांगितले. स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक कुंभमेळा आयोजित करणे हे सर्व यंत्रणांचे सामाईक उद्दिष्ट असावे. सामाजिक संस्था आणि लोकसहभाग यांच्या मदतीने हा कुंभमेळा अपघातमुक्त आणि यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.

विकासकामांसाठी मार्चची मुदत

कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित पायाभूत सुविधांची कामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण झाली पाहिजेत, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. भूसंपादन, रस्ते, जलपुरवठा, वीजपुरवठा आणि इतर महत्त्वाच्या कामांमध्ये कुठल्याही परिस्थितीत विलंब होऊ नये. कुंभमेळ्याच्या काळात अर्धवट कामे राहणार नाहीत, याची खात्री प्रत्येक विभागाने द्यावी, असेही त्यांनी सांगितले.

सुरक्षा व्यवस्थेसाठी आगाऊ आराखडा

कुंभमेळ्यादरम्यान पर्वणीचे दिवस आणि इतर कालावधीत पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यासाठी पूर्वनियोजन करावे. संभाव्य अडचणी लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करावा आणि आवश्यक साधनसामग्री तसेच मनुष्यबळ उपलब्ध ठेवावे, असे निर्देश राजेशकुमार यांनी दिले.

logo
marathi.freepressjournal.in