
कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबनात्मक गाण्यावरुन वातावरण तापलेलं असतानाच आता कुणाल कामराने अजून एका नवीन गाण्याचा व्हिडिओ पोस्ट केलाय.
हम होंगे कामयाब या गाण्याच्या ओळी बदलून हम होंगे कंगाल अशी रचना केलेले हे गाणे आहे. या गाण्यासोबत त्याने शिवसैनिकांनी केलेल्या तोडफोडीचा व्हिडिओ जोडला आहे. कामराने शिंदेंवर केलेले गाणे व्हायरल झाल्यावर शिवसैनिकांनी मुंबईच्या खार येथील युनिकॉन्टिनेन्टल हॉटेलमधील हॅबिटॅट स्टुडिओवर हल्ला चढवून सेटची तोडफोड केली होती. याच स्टुडिओमध्ये कामराचा शो झाला होता. तोडफोडीच्या त्या व्हिडिओला एडिट करुन आणि तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांचे चेहरे दाखवून "हम होंगे कंगाल एक दिन, मन में अंधविश्वास, देश का सत्यानाश......मन में नथुराम, हरकते आसाराम, हम होंगे कंगाल एक दिन" हे गाणे जोडण्यात आले आहे.
दरम्यान, कुणाल कामराने "मी माफी मागणार नाही, एकनाथ शिंदे यांच्याबाबत अजित पवार जे बोलले होते, तेच मी म्हटले आहे", असे एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. कोणत्याही कायदेशीर कारवाईसाठी पोलिस आणि कोर्टाला सहकार्य करण्यास तयार असल्याचेही त्याने सांगितले. "मला या जमावाची भीती वाटत नाही आणि बेडखाली लपून सर्व शांत होण्याची मी वाट बघत बसणार नाही", असेही कामराने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.